मतदार जागृतीसाठी युवती सरसावल्या
By Admin | Updated: September 30, 2014 23:36 IST2014-09-30T23:36:39+5:302014-09-30T23:36:39+5:30
मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मताधिकार या विषयावर पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे

मतदार जागृतीसाठी युवती सरसावल्या
गडचिरोली : मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मताधिकार या विषयावर पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात युवा नेक्स्टच्या सदस्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा. सातपुते, प्रा. त्रिपाठी, प्रा. डॉ. अनिता लोखंडे, डॉ. पाटील, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका वर्षा पडघन उपस्थित होत्या. यावेळी प्रा. सातपुते यांनी मताधिकाराविषयी मार्गदर्शन केले. मतदान या शब्दाचा प्रयोग न करता मताधिकार हा शब्दप्रयोग वापरावा, असे मत प्रा. सातपुते यांनी मांडले. मत ही दान करण्याची बाब नसून योग्य लोकशाहीसाठी योग्य उमेदवार निवडण्याची संधी असते. मतदान हा आपला अधिकार आहे. त्यामुळेच मताधिकार असा शब्दप्रयोग केला जातो, असे मतही त्यांनी मांडले. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ या प्रा. त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या पथनाट्याचे सादरीकरण कल्याणी मेश्राम, ज्योती मेश्राम, रूपाली मडावी, पूजा गायमुखे, शीतल नैताम यांनी केले. पथनाट्यातून योग्य उमेदवार कशा प्रकारे निवडायचा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रंगारंग कार्यक्रम सादर करून मतदानाविषयी जागृती केली.
ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मतदार आपला हक्क बजावत नाही. अनेकदा विविध कामाच्या व्यस्ततेमुळे अनेक जण मतदानाला मुकतात. त्यामुळे विविध भागात अत्यल्प मतदान होत असते. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहभेटी यासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. विविध ठिकाणी रॅली काढून घोषवाक्याच्या माध्यमातून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने महिला महाविद्यालयात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. अनिता लोखंडे तर आभार प्रा. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तनुश्री जोशी, मंगेश मसराम यांनी सहकार्य केले. यावेळी महिला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)