मित्राच्या लग्नकार्याला येण्याची स्वरूपची इच्छा राहिली अपूर्णच!
By Admin | Updated: March 24, 2015 01:49 IST2015-03-24T01:49:55+5:302015-03-24T01:49:55+5:30
अजय शेंडे नामक मित्राचा ३० एप्रिल २०१५ रोजी गडचिरोलीत लग्न समारंभ आयोजित

मित्राच्या लग्नकार्याला येण्याची स्वरूपची इच्छा राहिली अपूर्णच!
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
अजय शेंडे नामक मित्राचा ३० एप्रिल २०१५ रोजी गडचिरोलीत लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी स्वरूप अमृतकर याची त्याचा मित्र अजय शेंडे याच्याशी भेट झाली. यावेळी स्वरूपने अजयला तुझ्या लग्नात मी नक्की येतो. डिजेची व्यवस्था आहे काय? असे विचारत लग्न वरातीत नाचण्याची स्वरूपने ईच्छा व्यक्त केली होती. मात्र नियतीने आपला डाव साधून स्वरूपला हिरावून घेतले. त्यामुळे त्याची इच्छा अपूर्ण राहिली. दोघे आत्राम याच्यावरही नियतीने डाव साधल्याने त्यांच्या बालिकांचे पितृछत्र हरविले. वयाने अत्यंत लहान असलेल्या या निरागस बालिकांच्या जीवनात अंध:कार पसरला आहे.
दोघे आत्राम हा युवक एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कांदोली बुर्गी या गावातील राहणारा होता. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून २५ किमी तर पेरमिलीवरून १२ किमी अंतरावर कांदोली बुर्गी हे गाव आहे. दोघे याला एक मोठा भाऊ राजू व तीन बहिणी आहेत. तीन बहिणींचे लग्न झाले. त्यानंतर मोठ्या भावापाठोपाठ दोघे याचेही लग्न झाले.
गरीब कुटुंबाला आधार व्हावा म्हणून कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या अतिदुर्गम गावात राहणाऱ्या दोघे याने पोलीस भरतीची तयारी सुरू केली. त्यांच्या परीश्रमाला यश येऊन सन २००६ मध्ये दोघे आत्राम हा जिल्हा पोलीस दलात दाखल झाला. सी-६० पथकात कार्यरत राहून तो नक्षल्यांशी लढत राहिला. दोघे व रनव या दाम्पत्याला दोन मुली आहेत. पूजा ही १० वर्षाची मोठी मुलगी असून ती इयत्ता दुसरीत शिकत आहे. आचल नावाची दुसरी मुलगी पाच वर्षाची असून ती नर्सरीमध्ये शिकत आहे. दोघेच्या जाण्याने वृध्द मातापित्यांचा आधार हिरावला.
शहीद स्वरूप अमृतकर याला दोन भाऊ आहेत. त्याचे दोन्ही भाऊ पोलीस दलातच कार्यरत आहेत. कल्पना डोमळे (अमृतकर) ही त्याची आई येवली येथील जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. स्वरूपच्या आईनेच लहानपणापासून या तिन्ही मुलांचा सांभाळ केला. तो नेहमी मित्र परिवारात वावरायचा. बॉल बॅडमिंटनचा तो चांगला खेळाडू होता. स्वरूप हा २००९ मध्ये पोलीस दलात दाखल झाला. पोलीस दलात दाखल झाल्यापासून तो सी-६० पथकामध्ये कार्यरत होता.