दीक्षाभूमीचे रूप पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:31 IST2019-02-25T22:31:21+5:302019-02-25T22:31:37+5:30
शासनाच्या निधीतून देसाईगंज येथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर या दीक्षाभूमीचे रूप पालटणार आहे.

दीक्षाभूमीचे रूप पालटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शासनाच्या निधीतून देसाईगंज येथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर या दीक्षाभूमीचे रूप पालटणार आहे.
तब्बल ६३ वर्षानंतर देसाईगंज येथील दीक्षाभूमीची जागा समस्य जागृत बौद्ध महिला समितीच्या नावाने झाली. यासाठी शासन दरबारी प्रचंड पायपीट करावी लागली. अखेर गतवर्षी दीक्षाभूमीच्या जागेचा तिढा सुटला. राज्याच्या समाजकल्याण विभागाने दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले. पहिल्या टप्प्यात एकूण ५४ लाख रूपये या कामासाठी मंजूर करण्यात आले आहे.
मंजूर निधीतून प्रवेशद्वार व इतर कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती महिला समितीच्या सचिव ममता जांभुळकर यांनी दिली आहे. या दीक्षाभूमीला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी सदर समितीने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने एक ठराव पारित करून सदर दीक्षाभूमीला पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा प्रदान केला. तसेच याबाबतचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील बौद्ध समाजाबांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. वडसा येथील दीक्षाभूूमीच्या परिसरात पहिल्या टप्प्यात सांची दरवाजा, अंतर्गत रस्ते, प्रसाधनगृह, बगीचा, वाचनालय, इमारत आदी कामांचा समावेश आहे.
सांची प्रवेशद्वाराचे काम प्रगतीपथावर आहे. धम्मपीठ बनविण्यासाठी स्थानिक विकास निधी मंजूर असल्याची माहिती आहे. हे सुद्धा काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील हजारो बौद्ध समाजबांधव देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर जाऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात.