जिल्ह्यात जनजागृतीने वन्यजीव सप्ताहाचा समारोप
By Admin | Updated: October 11, 2015 02:33 IST2015-10-11T02:33:58+5:302015-10-11T02:33:58+5:30
जिल्ह्यात वन विभाग व शाळा, महाविद्यालयाच्या वतीने १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात जनजागृतीने वन्यजीव सप्ताहाचा समारोप
ठिकठिकाणी मार्गदर्शन : आरमोरी, अहेरी येथे महाविद्यालयात कार्यक्रम व वृक्षारोपण; क्षेत्र भेटीतून सांगितले महत्त्व
गडचिरोली : जिल्ह्यात वन विभाग व शाळा, महाविद्यालयाच्या वतीने १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहादरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करून समारोप करण्यात आला.
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या विज्ञान मंच पर्यावरण अभ्यास समिती व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित वन्यजीव सप्ताहाचा सामारोप गुरूवारी करण्यात आला. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान मंच प्रमुख प्रा. गंगाधर जुआरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयेश पापडकर, वनस्पतिशास्त्राचे प्रा. डॉ. वसंता कहालकर, पर्यावरण समिती प्रमुख प्रा. सत्येंद्र सोनटक्के, प्रा. डॉ. राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. जैवविविधता व प्राण्यांची वांशिकता अबाधित राखण्यासाठी प्राणिमात्रांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कहालकर यांनी केले. दरम्यान प्रा. गंगाधर जुआरे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सोनटक्के यांनी पर्यावरणाच्या संरक्षणात वन्यप्राण्यांची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेंद्र चव्हाण तर अभार गायत्री लोणारे हिने मानले. यशस्वीतेसाठी लक्ष्मण निमजे, सचिन ठाकरे, प्रशांत दडमल यांनी सहकार्य केले.
अहेरी : येथील एस. बी. महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचा सामारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. नागसेन मेश्राम, प्रा. पद्मनाभ तुंडुलवार उपस्थित होते. सप्ताहाच्या निमित्ताने हनुमान टेकडी परिसरातील परिक्षेत्रात कृतिमय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वन्यजीवात समाविष्ट मांसभक्ष्यी प्राणी, तृणभक्ष्यी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, किडे यांच्या साखळीबाबत सांगण्यात आले. अन्नसाखळीतील प्रत्येक प्राणी महत्त्वाचा असून प्राण्यांचे अस्तित्व दिवसेंदिवस नामशेष होत आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
तालुक्यातील मोसम येथे ग्राम पंचायत देवलमरी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त गावातील १०० कुटुंबांमार्फत प्रत्येकी पाच वृक्षांचे याप्रमाणे एकूण ५०० रोपांचे रोपण रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आले. करंज, सिसू, गुलमोहर आदींसह विविध प्रजातींच्या रोपांची लागवड यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला देवलमरी ग्रा. पं. च्या सरपंच पेंट्रताई पोरतेट, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास राऊत, सचिव वनरक्षक सी. व्ही. सडमेक, देवलमरी ग्राम पंचायतीचे सचिव एन. एम. झेंडे, उपसरपंच गजानन मडावी व वनव्यवस्थापन समितीचे तसेच ग्राम पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत वृत्तसेवा)