वनतलावामुळे वन्यप्राण्यांची झाली सोय
By Admin | Updated: June 3, 2015 01:59 IST2015-06-03T01:59:17+5:302015-06-03T01:59:17+5:30
दोन- तीन वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या वनतलावाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांना संरक्षण मिळाल्याचे घोट वन परिक्षेत्रात दिसून येत आहे.

वनतलावामुळे वन्यप्राण्यांची झाली सोय
घोट वन परिक्षेत्रातील काम : किरण पाटील यांच्या प्रयत्नातून साकारला प्रकल्प
घोट : दोन- तीन वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या वनतलावाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांना संरक्षण मिळाल्याचे घोट वन परिक्षेत्रात दिसून येत आहे. यासाठी वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील विशेष प्रयत्न करून आपल्या क्षेत्रात असलेल्या वन्य प्राण्यांची माहिती गोळा करीत आहेत.
चपराळा अभयारण्याला लागून असलेल्या घोट वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी असल्याचे सिद्ध झाले आहे. घोट येथील वनोद्यानाला आगून असलेल्या वनतलावावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांचे ‘फुटेज’ घेण्याची यंत्रणा वन परित्राधिकारी किरण पाटील यांनी अवलंबली आहे. वन विभागाच्या माध्यमातून ड्रिपसीसी (समतल सलग स्थर) व वनतलाव घोट वनोद्यानाला लागून निर्माण करण्यात आला आहे. या वनतलावामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात टँकरद्वारे पाणी आणून टाकल्या जात आहे. आठवड्यातून एकदा या वनतलावात पाणी टाकून वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचे काम वन विभागाच्या वतीने केले ाजत आहे. आलापल्ली वन परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात घोट वन परिक्षेत्राचे अधिकारी किरण पाटील व त्यांची चमू यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. वनतलावाच्या परिसरात वन विभागाच्या वतीने २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. मागील आठवडाभरात या वनतलावावर पाणी पिण्यासाठी अनेक वन्यप्राणी आलेत. यात प्रामुख्याने वाघ, अस्वल, मोर, रानकुत्रे, हरीण, चौसिंगा, चितळ, नीलगाय याासह रानडुकरांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पक्षीही मोठ्या प्रमाणावर या परिसरात वास्तव्यास असून लुप्त होत चाललेली गिधाडेही आढळली.
मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांच्या प्रयत्नातून घोट- आष्टी मार्गावर वनोद्यान निर्माण करण्यात आले आहे. या उद्यानाला लागून २०० मीटर अंतरावर वनतलाव व ड्रिपसीसी (समतल सलग स्थर) चर खोदून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पाच ते दहा किमी अंतरावर चपराळा अभयारण्य असून अभयारण्याला लागून बारमाही वाहणारी प्राणहिता नदी आहे. मात्र चपराळा अभयारण्यात सागवान वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने वन्यप्राण्यांच्या दृष्टीने हा भाग सुरक्षित नाही. त्यामुळे या अभयारण्याला लागून असलेल्या चपराळा परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आढळून येत आहेत. मागील दोन- चार वर्षांपासून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर आळा घालण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. परिणामी या क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. (वार्ताहर)