दादापुरात रानटी हत्तीचा कहर; धानासह उद्ध्वस्त केले घर !

By गेापाल लाजुरकर | Updated: June 14, 2023 18:54 IST2023-06-14T18:54:09+5:302023-06-14T18:54:23+5:30

शेतातून येऊन पाडली भिंत.

Wild elephant havoc in Dadapur; Destroyed the house with rice! | दादापुरात रानटी हत्तीचा कहर; धानासह उद्ध्वस्त केले घर !

दादापुरात रानटी हत्तीचा कहर; धानासह उद्ध्वस्त केले घर !

गडचिराेली : कुरखेडा तालुक्यातील दादापूर गावात रानटी हत्तींच्या कळपापासून विभक्त झालेल्या मोठ्या नर हत्तीने येथील एका घराची तोडफोड करून घरात ठेवलेल्या धानावर ताव मारत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. रानटी हत्तीने गावात कहर माजवून धानासह घर उद्ध्वस्त केले.

कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गावच्या हद्दीतील युवराज कोचे यांच्या शेताला लागूनच असलेल्या घराची भिंत पाडून घरात हत्तीने प्रवेश केला. हत्तीने घराची भिंत पाडली त्यावेळी घरातील सर्व सदस्य व बाहेरून आलेले पाहुणे जेवण आटाेपून बसले होते. हत्तीच्या अचानक हल्ल्यामुळे सर्व लोक घाबरले आणि घरातून पळून गेले. आवाज ऐकून गावातील लोक जमा झाले. दरम्यान, घरात ठेवलेले ११ पोते धान हत्तीने नासधूस केले. लोकांनी आरडाओरड करूनही हत्ती हलला नाही. पोटभर भात खाल्ल्यानंतर हत्ती तिथून निघून गेला.

सदर घटनेची माहिती पुराडा येथील वन परिक्षेत्र कार्यालयात देण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोरे, रामगडचे क्षेत्र सहायक संजय कंकलवार, बीट गार्ड सुरेश रामटे यांनी घटनास्थळ गाठून हत्तीला दादापूरला लागून असलेल्या जामटोला वनसंकुलात पळवले. परंतु पहाटे २ वाजतापर्यंत हा हत्ती पुन्हा दादापूर परिसरात परतला.

टस्कर हत्ती झाला एकलकाेंडा

दादापूर परिसरात वावरत असलेल्या हत्तीला टस्कर हत्ती म्हणतात. हा हत्ती आपल्या कळपात जाताे व पुन्हा परत येताे. त्याचा सहकारी कळप सध्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव पार्क परिसरात आहे. सध्या हा हत्ती एकलकाेंडा आहे. संपूर्ण कळप जर कुरखेडा तालुक्यात पुन्हा आला तर माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊ शकते. या हत्तींचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यातही वनविभागही अपयशी ठरत आहे.

Web Title: Wild elephant havoc in Dadapur; Destroyed the house with rice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.