वन्यप्राणी, पक्ष्यांची गावाकडे धाव
By Admin | Updated: May 3, 2015 01:11 IST2015-05-03T01:11:08+5:302015-05-03T01:11:08+5:30
देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर उपवनक्षेत्र परिसरातील तलाव, बोडी कोरड्या पडल्याने ...

वन्यप्राणी, पक्ष्यांची गावाकडे धाव
विसोरा : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर उपवनक्षेत्र परिसरातील तलाव, बोडी कोरड्या पडल्याने वन्यप्राणी व पक्षी गावाकडे पाण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र वनविभागाच्या वतीने योग्य उपाययोजना न केल्याने वन्यप्रेमींमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
शंकरपूरपासून दोन किमी अंतरावरील चोरमारी बोडी पूर्णत: कोरडी पडली आहे. तसेच उपवनक्षेत्रातील अन्य तलाव व बोड्यांचीही स्थिती सारखीच आहे. परिणामी जंगलातील नीलगाय, हरीण, चितळ, अस्वल, कोल्हे, डुकर आदी प्राणी तर दयाळ, शिंपी, साळुंकी, भारद्वाज, खंड्या, सुतारपक्षी, चिमणी, पारवा आदींसह अन्य जातींचे पक्षी पाणी पिण्याकरिता गावानजीकच्या तलावाकडे धाव घेत आहेत. सदर तलाव शंकरपूरपासून एक किमी अंतरावर असल्याने या ठिकाणी वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात या भागात शिकाऱ्यांमार्फत सापळे रचून वन्यप्राणी व पक्ष्यांना मारण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)