वन्य प्राणी व पक्ष्यांची पाण्यासाठी गावाकडे धाव
By Admin | Updated: April 2, 2016 01:46 IST2016-04-02T01:46:38+5:302016-04-02T01:46:38+5:30
देसाईगंज तालुक्यातील विसोरापासून तीन किमी अंतरावर शंकरपूर उपवनक्षेत्राला प्रारंभ होतो. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने ...

वन्य प्राणी व पक्ष्यांची पाण्यासाठी गावाकडे धाव
तलाव, बोड्या कोरडे : शिकारीचा धोका वाढला; वन विभागाचे नियोजन शून्य
विसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरापासून तीन किमी अंतरावर शंकरपूर उपवनक्षेत्राला प्रारंभ होतो. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने जंगलातील पाणीसाठे पूर्णत: कोरडे पडले आहेत. याशिवाय नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या ठणठणाट आहेत. उष्णतामान वाढत असल्यामुळे जंगलातील वन्यप्राणी व पक्षी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. पाणझळीमुळे जंगल निष्पर्ण झाले आहे. परिणामी जंगलातील अस्वल, नीलगाय, हरीण, ससा, कोल्हा, डुकर, तडस, बिबट, मोर आदी प्राणी तसेच पांजरा, तीतीर, साळुंकी आदींसह अन्य पक्षी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. विसोरा, शुकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव परिसरातील लोकवस्तीनजीकच्या पाणवठ्यावर हे वन्यप्राणी व पक्षी आगेकुच करीत असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. उष्णतामानही प्रचंड वाढल्यामुळे जंगलातील जलसाठे वेगाने कोरडे पडले आहेत. पाणी शिल्लक असलेल्या तलाव, बोडी व नदीकडे स्वत:ची तृष्णा भागविण्यासाठी वन्यप्राणी व पक्षी धाव घेत आहेत. पक्षी, प्राण्यांचे बेहाल थांबविण्यासाठी वन विभागान योग्य नियोजन करून जंगली भागात पाण्याची सुविधा करावी तसेच वन्यजीवांसाठी मोबाईल पाणी टँकची सुविधा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)