वायफायची योजना रखडली

By Admin | Updated: January 25, 2017 01:56 IST2017-01-25T01:56:43+5:302017-01-25T01:56:43+5:30

गडचिरोली, देसाईगंज व चामोर्शी शहरात बारा ठिकाणी वायफाय लावण्यासाठीचा प्रस्ताव गडचिरोली बीएसएनएल कार्यालयाने

Wifi plans | वायफायची योजना रखडली

वायफायची योजना रखडली

निधी मिळाला नाही : गडचिरोली, देसाईगंज व चामोर्शीत १२ ठिकाणी लागणार होते वायफाय
दिगांबर जवादे  गडचिरोली
गडचिरोली, देसाईगंज व चामोर्शी शहरात बारा ठिकाणी वायफाय लावण्यासाठीचा प्रस्ताव गडचिरोली बीएसएनएल कार्यालयाने मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मुख्य कार्यालयाने मंजुरी दिली आहे. मात्र निधी मिळत नसल्याने सदर वायफाय लावण्याचे काम दीड वर्षांपासून रखडले आहे.
शहरातील अपवाद वगळता प्रत्येक नागरिकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून ई-मेल, बँकींग यासारख्या सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत. मोबाईल बँकींगच्या माध्यमातून विज बिल, टेलिफोन बिल यासह इतर बिलांचाही भरणा करणे शक्य आहे. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील माहिती मोबाईलवर उपलब्ध होते. त्यामुळे स्मार्टफोन ही केवळ फॅशन नसून ती अत्यावश्यक गरज बनली आहे.
मोबाईलला टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलने बाराही तालुकास्थळी थ्री-जी सेवा सुरू केली आहे. मात्र स्मार्टफोनची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने इंटरनेटची पुरेशी स्पीड उपलब्ध होत नाही. त्यामुळे डाटा डाऊनलोड व अपलोड करण्यात अडचणी निर्माण होतात.
वायफाय हे स्वतंत्र इंटरनेटसाठी तयार केलेले साधन आहे. त्यामुळे वायफायची इंटरनेट स्पीड मोबाईल टॉवरच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक आहे. शहरात स्मार्टफोनची संख्या वाढल्याने इंटरनेट स्पीड पुरेशी राहत नाही. त्यामुळे वायफाय लावण्याची मागणी आहे. त्यानुसार गडचिरोली बीएसएनएल कार्यालयाने गडचिरोली शहरात आठ ठिकाणी देसाईगंज येथे दोन ठिकाणी व चामोर्शी येथे दोन ठिकाणी वायफाय लावण्याचा प्रस्ताव तयार केला.
सदर प्रस्ताव मुंबई येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविला असता, या कार्यालयाने वायफाय लावण्यास मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे दीड वर्षांपासून मंजुरी मिळूनही निधी अभावी वायफाय लावण्याचे काम रखडले आहे. वायफाय लावण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रूपये खर्च येतो. सदर निधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी आहे. वायफाय झाल्यास इंटरनेटची समस्या दूर होईल.

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, चामोर्शी मार्ग, बसस्थानक, सेमाना देवस्थान, आयटीआय चौक, कारगिल चौक, माऊंट कारमेल या ठिकाणी वायफाय लावण्याचे नियोजन करण्यात आले. देसाईगंज येथे बसस्थानक, फवार चौक, चामोर्शी येथे तहसील कार्यालय, बसस्थानक येथे वायफाय लावण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Web Title: Wifi plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.