लोह खनिज कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:36 AM2021-04-10T04:36:35+5:302021-04-10T04:36:35+5:30

सुरजागडच्या लोह खाणीतील मौल्यवान दगडांची पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस प्रकल्पात वाहतूक करण्याचे नियोजन कंपनीकडून केले जात आहे. एका ...

Who is responsible for the safety of iron ore workers? | लोह खनिज कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

लोह खनिज कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

Next

सुरजागडच्या लोह खाणीतील मौल्यवान दगडांची पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस प्रकल्पात वाहतूक करण्याचे नियोजन कंपनीकडून केले जात आहे. एका अपघाताच्या निमित्ताने उफाळून आलेला स्थानिक नागरिकांचा विरोध आणि पोलिसांच्या सुरक्षेपोटी थकीत असलेले भाडे यामुळे दोन वर्षांपासून हे काम बंद आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि नक्षल्यांचा विरोध मोडून काढत पुन्हा एकदा लोह खाण सुरू करण्यासाठी कामगारांची जुळवाजुळव केली जात आहे. वास्तविक दोन महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी एका युवकाची हत्या केल्यानंतर अनेकजण लोह खाणीत कामगार म्हणून जाण्यासाठी सहजासहजी तयार होताना दिसत नाही. मात्र मोठी बेरोजगारी असल्यामुळे काही युवक जिवावर उदार होऊन अल्का कन्सल्टन्सीकडे आपले संमतीपत्र लिहून देत आहेत. कामगारांकडून त्यांची आपली माहिती भरून घेताना दिलेल्या अटी व शर्तीमध्ये आपल्याला नक्षलग्रस्त भाग आणि येथील परिस्थितीची जाणीव असून, आपल्या जबाबदाऱ्यांसाठी कंपनीला जबाबदार धरले जाणार नाही, असे नमूद आहे. यासंदर्भात कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या सहीने एक वेगळे हमीपत्रही लिहून घेतले जाणार आहे.

या अटीमुळे कामगारांच्या जीवितास काही झाले तर त्यांचे कुटुंबीय कोणताही मोबदला कंपनीकडे मागू शकणार नाही. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार अल्का कन्सल्टन्सीसोबत होत असून, लॉयड्स मेटल्सकडून कोणत्याही कामगाराला स्थायी नोकरी मिळणार नसल्यामुळे अनेक सुशिक्षित युवक तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीची ऑफर धुडकावत आहेत.

(बॉक्स)

बाहेरील लोकांनाच प्राधान्य

सुरजागडच्या लोह खाणीची लीज लॉयड्स मेटल्स या कंपनीला मिळाली असली तरी ही कंपनी आता केवळ नावापुरतीच राहिल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात लॉयड्सने हे काम दक्षिण भारतातील त्रिवेणी मायनिंग या कंपनीकडे सोपवले आहे. त्रिवेणी कंपनीने लोह खाणीच्या कामासाठी कामगार जुळवण्याचे काम अल्का कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडे सोपविले. वास्तविक लोह खनिज प्रकल्प उभारण्यापासून तर लोहदगड वाहतुकीपर्यंतची कामे स्थानिक लोकांनाच दिली जाईल, असा देखावा कंपनीकडून आधी करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात बाहेरील लोकांनाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे स्थानिक लोकांना केवळ मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

Web Title: Who is responsible for the safety of iron ore workers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.