महिला रूग्णालयाचा मुहूर्त कधी?
By Admin | Updated: April 17, 2016 01:14 IST2016-04-17T01:14:30+5:302016-04-17T01:14:30+5:30
मागील एक ते दीड वर्षांपासून गडचिरोली शहरात महिला व बाल रूग्णालयाची इमारत तयार झाली आहे.

महिला रूग्णालयाचा मुहूर्त कधी?
दोन वर्षांपासून इमारत तयार : वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे प्रतीक्षा
गडचिरोली : मागील एक ते दीड वर्षांपासून गडचिरोली शहरात महिला व बाल रूग्णालयाची इमारत तयार झाली आहे. मात्र या रूग्णालयासाठी लागणारे दीडशेवर डॉक्टर व कर्मचारी यांची पदे भरण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी प्रदान केलेली नाही. त्यामुळे येथे महिला रूग्णालय सुरू होण्यास अडचण निर्माण झाली आहे. या महिला रूग्णालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी निघणार, अशी प्रतीक्षा गडचिरोली जिल्हावासीयांना आहे.
तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली शहरात महिला व बाल रूग्णालयाची वास्तू उभी राहिली आहे. ही वास्तू जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येणार होती. परंतु तत्कालीन आमदार डॉ. उसेंडी यांनी पालकमंत्री आर. आर. पाटील यांना समजावून देत शहरात ही वास्तू निर्माण केली. आर. आर. पाटील यांनी या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वेळोवेळी उपलब्ध करून देत वेळेच्या आत ही वास्तू बांधून पूर्ण केली. या महिला व बाल रूग्णालयासाठी जवळजवळ दीडशे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज आहे. विद्यमान भाजप सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची निकड लक्षात घेऊन या रूग्णालयाकरिता पदभरतीला मंजुरी देण्याची गरज होती. परंतु हा प्रस्ताव प्रलंबित पडून आहे. या संदर्भात विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनीही गांभीर्याने नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत २९३ अन्वये आरोग्य विषयक प्रश्नावर चर्चा घडवून आणली. या चर्चेत जिल्ह्यातील एकमेव स्त्री रूग्णालयाची इमारत दोन वर्षांपासून बांधून पूर्ण झाली. मात्र पदभरतीअभावी रूग्णालयाचे उद्घाटन रखडलेले आहे. त्यामुळे रूग्णालयाच्या बांधकामाला परवानगी देतानाच पदभरतीची मान्यताही त्यात समाविष्ट करावी, हा महत्त्वाचा मुद्दा विधीमंडळात मांडला व शासनाने डॉक्टरांची पदे या रूग्णालयासाठी मंजूर करावी, अशी मागणी केली. यापूर्वी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या रूग्णालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरविला होता. परंतु पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पदभरतीला मान्यता दिल्याशिवाय रूग्णालयाचे उद्घाटन करू नये, अशी सकारात्मक भूमिका घेतली होती. इमारत काही रूग्णांवर उपचार करणार नाही, डॉक्टर लागतील. त्यामुळे उद्घाटन करू नका आधी डॉक्टर द्या, असे सांगितले. त्यामुळे उद्घाटनाचा मुहूर्त टळला. सरकार कधी पदभरतीला मंजुरी देते याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच हे रूग्णालय सुरू होईल, असे दिसून येते.