गडचिरोलीच्या प्रथम नागरिक जेव्हा संतापतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 02:08 PM2020-09-22T14:08:16+5:302020-09-22T14:08:46+5:30

गडचिरोली शहराच्या प्रथम नागरिक, अर्थात या शहराच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे अलीकडे न पटणाऱ्या गोष्टींबद्दल जाहीरपणे आपला संताप व्यक्त करताना दिसतात.

When the first citizens of Gadchiroli get angry ... | गडचिरोलीच्या प्रथम नागरिक जेव्हा संतापतात...

गडचिरोलीच्या प्रथम नागरिक जेव्हा संतापतात...

Next

मनोज ताजने
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहराच्या प्रथम नागरिक, अर्थात या शहराच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे अलीकडे न पटणाऱ्या गोष्टींबद्दल जाहीरपणे आपला संताप व्यक्त करताना दिसतात. परवा विश्राम गृहात व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत जनता कर्फ्यू पाळण्यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय सभेतही त्यांनी एका मुद्द्यावरून आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. मुद्दा होता फेसबुकवरील कमेंट्सचा.

गडचिरोली शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवरून कोणीतरी त्यांना टार्गेट करताना ‘नगराध्यक्ष काय झोपेत आहेत का’ अशा शब्दात कमेंट टाकली. अशा आशयाच्या इतरही काही कमेंट्स केल्या असतील, त्या मुद्यावरून नगराध्यक्ष मॅडम उद्विग्न झाल्या. ‘जाहीर कमेंट्स करताना अशा शब्दात भावना व्यक्त करणे योग्य नाही, राजकारणात पातळी सोडू नका,’ असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांना खडे बोल सुनावले. त्यानंतर आमदार डॉ.देवराव होळी यांनी त्याबाबत समजावणीचा सूर घेत नगराध्यक्षांना अशा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. राजकारणात वावरत असताना स्तुतीसोबत टिकाही होतच असते. प्रत्येकच राजकीय पदाधिकाऱ्याला ते सहन करावे लागते, त्यामुळे ते जास्त मनावर घेऊ नका, असे म्हणत त्यांचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला. ही सभा ‘जनता कर्फ्यू’ लावण्यासंदर्भात असली तरी नगराध्यक्षांनी व्यक्त केलेला संताप सभेच्या शेवटी उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय झाला.

खरं म्हणजे नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचा पिंड राजकारणाचा नाही. साडेतीन वर्षाआधी नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याआधी त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. तरीही गेल्या तीन वर्षात त्यांनी आपल्या वर्क्तृत्वाला धार देत भाषणात आक्रमकता आणली. पण एकीकडे विरोधकांवर आक्रमक होताना अनेक गोष्टी संयमानेही घ्याव्या लागतात. काही वेळा जाणीवपूर्वक ठेवलेला संयमही विरोधकांना नामोहरण करणारा असतो. राजकारणात वावरणाऱ्यांना कायम आपल्या जीभेवर साखर पेरून लोकांना आपलेसे करणे गरजेचे असते. प्रत्येक ठिकाणी दुर्गावतार दाखवून चालत नाही. काही दिवसांपासून आपल्याच पक्षाच्या काही नगरसेवकांच्या विरोधी भूमिकेमुळे त्या त्रस्त झाल्या असू शकतात. असे असले तरी संयमातून जी समस्या सुटू शकते ती संतप्त होऊन सुटेलच असे नाही.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे सत्य नाकारता येत नाही. त्याची जबाबदारी तालुका प्रशासनासोबतच नगर परिषदेचीही आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढल्याच्या १५ दिवसानंतर नगर परिषदेने नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली. त्यातही सातत्य ठेवले नाही. वास्तविक जे काम प्रशासनाच्या हाती होते ते आधीच केले असते तर बऱ्याच प्रमाणात शहरातील समूह संसर्गाला रोखता आले असते. प्रशासनाने नियम घालून दिले म्हणजे लोक त्याचे तंतोतंत पालन करतीलच असे नाही. त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठीच दंडात्मक कारवाईची तरतूद असते. पण कारवाईच होत नसल्यामुळे लोक बिनधास्त होऊन विनामास्क फिरू लागले आणि कोरोनाचा प्रसार वाढायला सुरूवात झाली.

तात्पर्य हेच की, कोरोनाची वाढ रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासन किंवा पदाधिकाºयांनी अधिक तत्पर राहणे अपेक्षित होते. ती तत्परता दिसली नाही म्हणून कोणी संतप्तपणे फेसबुकवर प्रतिक्रिया दिली असेल. पण हे करताना नागरिकांनी सभ्य भाषेतच भावना व्यक्त करणे अपेक्षित आहे. राजकारणातील उन्हाळे-पावसाळे पाहणाऱ्या व्यक्तीला नागरिकांचे किंवा विरोधकांचे असे शाब्दिक प्रहार झेलण्याची सवय असते. नगराध्यक्षांना त्याची सवय नसल्यामुळे त्यांना वाईट वाटणे साहजिक आहे. अशावेळी शब्दातून उत्तर देण्याऐवजी कृतीतूनच उत्तर देणे कोणत्याही जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीसाठी अधिक शहाणपणाचे ठरू शकते.

Web Title: When the first citizens of Gadchiroli get angry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.