खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:02+5:302021-07-17T04:28:02+5:30
गडचिराेली : विद्यादानाचे कार्य करण्यासाेबतच शिक्षकांकडे अनेक अशैक्षणिक कामांचा भार शासनाकडून सतत साेपविला जाताे. त्यामुळे शैक्षणिक विषयांकडे दुर्लक्ष हाेत ...

खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे...?
गडचिराेली : विद्यादानाचे कार्य करण्यासाेबतच शिक्षकांकडे अनेक अशैक्षणिक कामांचा भार शासनाकडून सतत साेपविला जाताे. त्यामुळे शैक्षणिक विषयांकडे दुर्लक्ष हाेत असल्याची ओरड अनेक शिक्षक नव्हे, तर शिक्षक संघटनासुद्धा अनेकदा करतात. परंतु त्याकडे शासनाकडून अनेकदा दुर्लक्ष करण्यात आले. खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे आहेत का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित हाेत आहे.
विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे, ज्ञान देणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्ये आहेत. परंतु हे कर्तव्य साेडून शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामे लादली जातात. याबाबत अनेकदा शिक्षक, शिक्षक संघटनांनीसुद्धा आवाज उठविला. परंतु ताे आवाज नेहमी शासनाकडून दाबला जाताे आणि सातत्याने अशैक्षणिक कार्ये करण्यास शिक्षकांना भाग पाडले जाते. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे काम, जनगणनेचे काम, शालेय पाेषण आहाराची कामे जिल्हा परिषद शिक्षकांकडून सातत्याने करून घेतली जातात.
बाॅक्स...
शिक्षकांना करावी लागतात अशी विविध कामे
- शालेय पाेषण आहाराचे वितरण करणे, खिचडी शिजविणे, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करून देणे, शाळा इमारतीचे बांधकाम, डागडुजी, रंगरंगाेटी करणे.
- काेराेना संसर्ग महामारीच्या काळात चेकपाेस्टवर कर्तव्य बजावणे, संशयित रुग्णांना ठेवलेल्या विलगीकरणाच्या ठिकाणी हजर राहून नियंत्रण ठेवणे, तेथील सुविधांची व्यवस्था करणे आदी कामे साेपविण्यात आली हाेती.
- जनगणनाा सर्वेक्षण, मतदार याद्यांचे काम करणे, निवडणूक केंद्रावर जाऊन काम करणे याशिवाय विविध अशैक्षणिक कामांबाबतचे प्रशिक्षण करणे.
बाॅक्स...
एकशिक्षकी शाळेचे हाल
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४६८ शाळा आहेत. अहेरी उपविभागात एक व दाेन शिक्षकी शाळांचीही संख्या माेठी आहे. एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांना विद्यादानासाेबतच अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे, शाळासंबंधीची प्रशासकीय कामे, शिक्षक वेतनाबाबतची कामे, शैक्षणिक सुनावणी, सेवानिवृत्ती आदी सर्व कामे करावी लागतात. शाळेत एक किंवा दाेन शिक्षक नियुक्त असलेल्या ठिकाणी बऱ्याचदा एकच शिक्षक अध्यापनाचे काम करीत असतो, एक शिक्षक बाहेर असताे.
बाॅक्स...
याेजनांचीही कामे
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी शासनाने अनेक याेजना विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित केल्या आहेत.
- विविध शिष्यवृत्तींची कामे शिक्षकांना करावी लागतात.
- याशिवाय प्रशासनाचे विविध उपक्रम व जनजागृती करावी लागते.
काेट....
विद्यार्थ्यांना शिक्षण व ज्ञान देणे हे शिक्षकांचे पहिले कर्तव्य आहे. शिक्षकांनी त्यांची कर्तव्ये लक्षात घेतली पाहिजे. शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे असूच नयेत, यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असताे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया याेग्यरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक त्याच कामात असले पाहिजे. जेणेकरून गुणवत्तेवर परिणाम हाेणार नाही.
- आर. पी. निकम,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प., गडचिराेली
..............
काेराेना संसर्ग महामारीच्या काळात शिक्षकांना चेकपाेस्टवर तसेच रेशन दुकाने व इतर गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले हाेते. याशिवाय निवडणुकीची व जणगणनेची कामे करावी लागतात. शाळेत खिचडी शिजविण्याचे काम करावे लागते. अशैक्षणिक कामे शासनाने देऊ नये, अशैक्षणिक कामातून मुक्तता करावी.
- यशवंत शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, गडचिराेली
............
शिक्षकांकडे बरीच अशैक्षणिक कामे आहेत. यासंदर्भात शिक्षक समिती व इतर संघटनांच्यावतीने अनेकदा आंदाेलने करण्यात आली. अलीकडेच उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शासनाने पालन करावे. शिक्षकांकडे असलेली खिचडी वाटपाची कामे, निवडणुकीसंबंधीची कामे काढून घ्यावीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी.
- धनपाल मिसार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती