काय, कसे आहात मुलांनो तुम्ही?
By Admin | Updated: December 16, 2014 22:52 IST2014-12-16T22:52:08+5:302014-12-16T22:52:08+5:30
ज्यांनी कधी आपले गावही सोडले नसेल व मोठ्या शहराचेच काय तालुका मुख्यालयाचेही दर्शन त्यांना कदाचित पहिल्यांदाच झाले असावे, अशा दुर्गम व अतिदुर्गम भागातील ८० विद्यार्थ्यांनी

काय, कसे आहात मुलांनो तुम्ही?
नागपुरात झाली भेट : मुख्यमंत्र्यांनी सहलीच्या विद्यार्थ्यांना विचारले
गडचिरोली : ज्यांनी कधी आपले गावही सोडले नसेल व मोठ्या शहराचेच काय तालुका मुख्यालयाचेही दर्शन त्यांना कदाचित पहिल्यांदाच झाले असावे, अशा दुर्गम व अतिदुर्गम भागातील ८० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपूर येथे सुसंवाद साधला. काय कसे आहात?, कशी झाली तुमची सहल? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना विचारला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या संवादाने विद्यार्थी प्रचंड भरावून गेलेत. हा दुग्धशर्करा योग जुळून आला. तो महाराष्ट्र पोलीस विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण जयंती योजनेंतर्गत महाराष्ट्र दर्शन सहलीच्या निमित्ताने.
महाराष्ट्र दर्शन सहलीवरून परतणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील ८० आदिवासी मुलामुलींनी या सहलीत सहभाग घेतला. सहलीतील या आदिवासी भागातील या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य मंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त के. के. पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाकडून गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणातून रोजगार व रोजगारातून समृद्धी हा उपक्रम राबविला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी राज्यशासनाकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्र दर्शन सहलीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसारखी मोठी शहरे बघायला मिळाली. याचा आनंद विद्यार्थ्यांनी कथन केलेल्या अनुभवातून यावेळी जाणवत होता. पहिल्यांदाच विमानतळ, विमान, गेट वे आॅफ इंडिया, फिल्म सिटी व समुद्र पहिल्यांदाच बघितल्याचे या सहलीतील आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. सहलीतील या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत विधानभवनाचे कामकाज पाहिले. मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या भेटी विद्यार्थ्यांनी यावेळी घेतल्या. (स्थानिक प्रतिनिधी)