बँकांमधील गर्दीचे करायचे काय? काेराेनाच्या निर्बंधातही बेशिस्तपणाला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:00+5:302021-05-05T05:00:36+5:30
गडचिरोली शहरातील दोन प्रमुख बँकांमध्ये पाहणी केली असता बँक प्रशासनाकडून कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते; पण ग्राहक मात्र नियम तोडल्याशिवाय राहत नाहीत. बँक ऑफ इंडियाने मुख्य प्रवेशद्वारासमोर ग्राहकांना बसण्यासाठी विशिष्ट अंतर ठेवत खुर्च्या ठेवल्या आहेत. तेथून क्रमवारीनुसार तीन-तीन जणांना आतमध्ये सोडले जाते. मास्क लावल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

बँकांमधील गर्दीचे करायचे काय? काेराेनाच्या निर्बंधातही बेशिस्तपणाला ऊत
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरील माणसांचे एकत्रीकरण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे; पण बँकेत येणारे ग्राहक त्या उद्देशाला हरताळ फासत आहेत. कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आपला नंबर लवकर लागावा याची घाई प्रत्येकजण करताना दिसून येत आहे. त्यामुळे बँकांमधील ही गर्दी कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत तर ठरत नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. गडचिरोली शहरातील दोन प्रमुख बँकांमध्ये पाहणी केली असता बँक प्रशासनाकडून कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते; पण ग्राहक मात्र नियम तोडल्याशिवाय राहत नाहीत.
बँक ऑफ इंडियाने मुख्य प्रवेशद्वारासमोर ग्राहकांना बसण्यासाठी विशिष्ट अंतर ठेवत खुर्च्या ठेवल्या आहेत. तेथून क्रमवारीनुसार तीन-तीन जणांना आतमध्ये सोडले जाते. मास्क लावल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
सॅनिटायझर, मास्क याचा तर कटाक्षाने वापर केला जातो. हीच स्थिती स्टेट बँक ऑफ इंडिया येथेही आहे. या बँकेत तर एकावेळी एकाच ग्राहकाला आत सोडले जाते. विशेष म्हणजे ग्राहकांनी दारावर गर्दी करू नये म्हणून प्रत्येकाला नंबरच्या चिठ्ठ्या दिल्या जातात; पण तरीही दारासमोर उभे राहून ग्राहक आत जाण्याची प्रतीक्षा करताना दिसतात.
अधिकारी होतात हतबल
आतमध्ये गेलेला ग्राहक कुठे फिरेल आणि किती वेळ लावेल याचा नेम नसतो. बँकेची वेळ संपत आली त्यावेळी बाहेर असलेल्या सर्वांना आतमध्ये घेतले जाते. त्यावेळी गर्दी होते. अशावेळी बँकेचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
बँकेत कमीत कमी लोकांनी यावे यासाठीच बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा घालून दिली आहे. केवळ पैसे किंवा चेक जमा करणे आणि काढणे हेच व्यवहार सुरू आहेत. बाहेर थांबणाऱ्या ग्राहकांसाठीही जागेची मर्यादा असल्याने चार लोकांना एकावेळी आत सोडले जाते.
- अनुपम रवी,
व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया
सर्वाधिक ग्राहक, शिस्तीचे पालन
बँकेत प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला नंबरची कागदी चिठ्ठी दिली जाते. वॉचमन त्यावरील नंबर पुकारतो. त्यानुसार ग्राहकाला आतमध्ये साेडल्यानंतर ताे आपले व्यवहार करतो. त्यामुळे बॅंकेच्या आतील गर्दीवर बरेच नियंत्रण आले आहे.
आता बँकेची वेळ सकाळी १० ते २ पर्यंतच केली आहे. पेन्शनसाठी येणाऱ्या वृद्ध ग्राहकांची सध्या गर्दी आहे. त्यांना प्राधान्याने आत सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय मनुष्यबळ कमी असताना अतिरिक्त काऊंटरही लावले आहेत.
- शामराव ईसनसुरे,
व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया
ग्राहकांना करावी लागते एक ते दीड तास प्रतीक्षा
मी पैसे काढण्यासाठी बँकेत आले आहे. एक तासापेक्षा जास्त वेळ गेटबाहेर वाट पाहावी लागली. एटीएम नाही म्हणून प्रत्यक्ष बँकेत येऊन पैसे काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
- ज्योत्स्ना मामीडवार, ग्राहक
मी किराणा एजन्सीचे पैसे टाकण्यासाठी आलो आहे. दीड तासापासून रांगेत आहे. खूप परेशानी आहे. दोन वाजेपर्यंतच वेळ असल्यामुळे लोकांची गर्दी जास्त वाढत आहे.
- गुरूदेव कुनघाडकर, ग्राहक
लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार कमी होत आहेत; पण तरीही अनेक जणांना बँकेतून पैसे काढल्याशिवाय भागत नाही. विशेषत: पेन्शनधारकांना बँकेत यावेच लागते. वेळ मर्यादित असल्याने जास्त त्रास होतो.
- राजेंद्र चौधरी, ग्राहक