जनसुनवाईत काढले आरोग्य सेवेचे वाभाडे
By Admin | Updated: July 3, 2014 23:34 IST2014-07-03T23:34:44+5:302014-07-03T23:34:44+5:30
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती खस्ताहाल आहे. आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या समस्या जि. प. च्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या

जनसुनवाईत काढले आरोग्य सेवेचे वाभाडे
आरोग्य केंद्र रडारवर : अपुऱ्या सोयी-सुविधांच्या समस्या मांडल्या
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती खस्ताहाल आहे. आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या समस्या जि. प. च्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या लोकाधारित देखरेख प्रक्रियेअंतर्गत जिल्हा जनसुनवाईत मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्या अनेक मान्यवरांनी मांडून आरोग्य सेवांचे वाभाडेच काढले.
जनसुनवाईला जिल्हा देखरेख व नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, डॉ. अनिल रूडे, डॉ. नितीन जाधव, अॅड. पौर्णिमा उपाध्ये, अॅड. अविला थराईल, महिला बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, जि. प. सदस्य लक्ष्मी मने, पं. स. सदस्य चांगदेव फाये आदी उपस्थित होते.
रूग्णालयात येणाऱ्या सर्व रूग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. अनेक डॉक्टर सरकारी रूग्णालयात सेवा न देता खासगी दवाखान्यात उपचार करतात व अतिरिक्त पैसे उकळतात. अनेक आरोग्य केंद्राच्या इमारती नादुरूस्त आहेत. अडपल्ली माल आरोग्य केंद्रात बाळतपणाला विलंब झाल्याने पाच बालमृत्यू झाले. अशा प्रकारचे अनेक विषय उपस्थितांनी जनसुनवाईत मांडले. दरम्यान मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. उंदीरवाडे, येंगलखेडा उपकेंद्रातील आरोग्य सेवक पी.बी. धोटे, मारोडा उपकेंद्रातील आरोग्य सेविका सोनी भटकर, पोटेगावचे डॉ. म्हशाखेत्री, देऊळगाव आरोग्य केंद्रातील डॉ. सुरेश दामले यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनसुनवाईत रूग्णांकडून पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, सरकारी दवाखान्यात आलेल्या रूग्णास खासगी रूग्णालयात पाठविले जाणार नाही. आरोग्य संस्थांची कामे खुल्या पद्धतीने करणे, आदी निर्णय घेण्यात आले. प्रास्ताविक मनोहर हेपट तर संचालन शुभदा देशमुख यांनी केले.