Welcoming 14,000 new students | १४ हजारांवर नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
१४ हजारांवर नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

ठळक मुद्देअनेक गावात निघाली रॅली : काही ठिकाणी पुस्तकांचेही वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१९-२० या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ बुधवारी (दि.२६)पासून झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम राबवून इयत्ता पहिलीतील जिल्हाभरातील १४ हजारांवर नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी रॅली काढून शैक्षणिक जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीतून वाजतगाजत गावात फिरवून शाळेत आणण्यात आले.
विसोरा- देसाईगंजपासून १५ किमी अंतरावर डोंगरमेंढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गावातून प्रभातफेरी काढून प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद कुथे यांनी यंदा पहिल्या वर्गात दाखल पाच विद्यार्थ्यांचे छायाचित्र व नाव असलेला बॅनर बनविला. गावातील गल्लीबोळातून प्रभातफेरी काढून ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, बालकांचे शिक्षण देशाचे रक्षण, आपली मुले शाळेत पाठवा’ अशा प्रकारचे शिक्षणाचे महत्त्व सांगणारे नारे विद्यार्थ्यांनी लावले. प्रभातफेरीत विद्यार्थ्यांच्या हातात पुष्प देण्यात आले होते. त्यानंतर सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
भामरागड - तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रमशाळेत विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी काढून शैक्षणिक जनजागृती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विलास तळवेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी खलीद शेख, चिन्नू महाका, पालक कमला पुंगाटी, सुमन दुर्वा, महेश तलांडी, शारदा भसारकर आदी उपस्थित होते. कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या प्रतिमा पूजनाने प्रवेशोत्सव कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गातून प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
भामरागड तालुक्यातील कोयनगुड्डा जि.प.प्राथमिक शाळा नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे या गावात बैलबंडीवरून प्रवेश दिंडी काढून नवागतांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. मुलांना खाऊ व गोड जेवण देण्यात आले. तसेच टीव्हीवर बोधकथा दाखविण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष हबका, मुख्याध्यापक विनीत पद्मावार, शिक्षक वसंत इष्टाम यांच्यासह ग्रामस्थ, पालक व महिला उपस्थित होत्या. रॅलीतून शैक्षणिक जनजागृती करण्यात आली.
कोकडी - देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथे रेणुकाबाई विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नव्याने शाळेत व अंगणवाडीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीवर बसवून शाळेपर्यंत पोहोचविण्यात आले. येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोकडी गावात जि.प.उच्च प्राथमिक शाळा, तिरूपती विद्यालय, धनंजय माध्यमिक आश्रमशाळा, विनायक प्राथमिक आश्रमशाळा व विवेकानंद प्राथमिक शाळेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. बैलबंडी, कार व ट्रॅक्टर सजवून यातून मुख्य मार्गाने नवागतांचे रॅली काढण्यात आली. तिरूपती विद्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप कोकडीच्या जि.प.च्या शाळेत करण्यात आला. दरम्यान डीआयईसीपीडीचे विषय सहायक संजय बिडवाईकर, आसफिया सिद्धीकी आदींनी कलापथकाद्वारे नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांचे रंगारंग कार्यक्रम पार पडले. यावेळी पं.स.चे सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, अधिव्याख्यात संभाजी भोजने, डॉ.नरेश वैद्य, जि.प.चे समाजकल्याण अधिकारी पेंदाम, कार्यकारी अभियंता घोडमारे, अधिव्याख्याता पुनित मानकर, गटशिक्षणाधिकारी डॉ.पीतांबर कोडापे, संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्यासह सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते.
भामरागडचे मॉडेल स्कूल व नेलगुंडाच्या शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया नेलगुंडा येथील साधना विद्यालयाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी बुधवारला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमुरादपणे संवादही साधला. याप्रसंगी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, साधना विद्यालयाच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे (गोडसे) उपस्थित होत्या. याप्रसंगी गावातील आदिवासी नागरिकांना वीर बाबुराव शेडमाके सुलभ जात प्रमाणपत्र योजनेअंतर्गत जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी आदिवासी नागरिकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यापूर्वी २२ जून रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या भामरागड येथील मॉडेल स्कूलला सुद्धा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली होती. बुधवारी पुन्हा शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाºयांनी या शाळेत हजेरी लावली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांशी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्वात उच्च प्रतीची शाळा म्हणून मॉडेल स्कूलला उदयास आणण्याचे आपले स्वप्न असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील राहा, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी उपस्थित शिक्षकांना दिल्या. याप्रसंगी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल, संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके, शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्रकल्प अधिकारी विजय मोरे उपस्थित होते.
डोंगरतमाशीतील शाळा भरली झाडाखाली
वैरागड - आरमोरी पंचायत समितीअंतर्गत डोंगरतमाशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली. या इमारतीच्या निर्लेखनाचा ठराव जि.प.च्या सभेत जानेवारी महिन्यात पारित करण्यात आला. त्यानंतर येथे नव्याने शाळा इमारत बांधण्यात आली नाही. त्यामुळे सदर शाळेतील शिक्षकांना शाळेच्या पहिल्या दिवशी बुधवारला झाडाखाली वर्ग भरवावे लागले.
सन २००७-०८ मध्ये डोंगरतमाशी येथे शाळा इमारत बांधण्यात आली. सदर इमारत जीर्ण झाल्याने २९ जानेवारी २०१९ मध्ये या इमारतीचे निर्लेखन करण्यात आले. निर्लेखनाचा ठराव पारित झाल्यानंतरही शाळेची नवी इमारत न बांधल्याने जीर्ण इमारतीत पालकांनी आपली मुले बसविण्यास विरोध केल्याने शेवटी शिक्षकांनी झाडाखाली शाळा भरविली. डोंगरतमाशी येथील शाळेत पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून १६ विद्यार्थी संख्येमागे दोन शिक्षक कार्यरत आहेत. सन २००७-०८ या वर्षात बांधलेली इमारत अल्पावधीत जीर्ण झाली. त्यामुळे २१ आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत या शाळा इमारतीच्या निर्लेखनाचा ठराव पारित करून नवीन शाळा इमारत बांधण्याचे निर्देश बांधकाम विभाग वडसा यांना देण्यात आले. मात्र बांधकामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगून या ठिकाणी शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात आले नाही. जोपर्यंत नवीन इमारत उभारणार नाही, तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय पालकांनी घेतला व २५ जून रोजी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना हा निर्णय कळविण्यात आला. यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. २६ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खेमनाथ पेंदाम व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. परंतु केंद्रप्रमुख बी.डी.सेलोटे व येथील शिक्षकांनी पालकांची समजूत काढून पहिल्या दिवशीची शाळा परिसरातील झाडाखाली भरविली. यापुढे नवीन इमारत होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीत ही शाळा भरविली जाणार आहे. नवीन इमारत लवकरात लवकर बांधण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
डोंगरतमाशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत २००८ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पाच-सहा वर्षांतच या शाळा इमारतीला भेगा पडल्या. आता तर इमारतीच्या भिंती कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने सदर इमारतीचे बांधकाम करणारी यंत्रणा व संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Web Title: Welcoming 14,000 new students
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.