विदर्भ गर्जना यात्रेचे स्वागत
By Admin | Updated: March 2, 2015 01:20 IST2015-03-02T01:20:51+5:302015-03-02T01:20:51+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात आली आहे.

विदर्भ गर्जना यात्रेचे स्वागत
देसाईगंज : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात आली आहे. सदर विदर्भ गर्जना यात्रा रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज शहरात पोहोचल्यानंतर नागरिकांच्या वतीने या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील फवारा चौकात मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विदर्भ गर्जना यात्रेतील अरूण केदार रंजना मामर्डे, राम नेवले, माजी मंत्री रमेश गजबे यांनी विदर्भ राज्याच्या मागणीवर मार्गदर्शन केले.
गोंदिया जिल्ह्यातून सदर विदर्भ गर्जना यात्रा देसाईगंज शहरात दाखल झाली. यावेळी यात्रेतील विदर्भवादी नेत्यांनी विदर्भ राज्य नक्कीच घेऊ, असा निर्धार मार्गदर्शनातून व्यक्त केला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा अनुशेष भरून काढता येऊ शकत नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता विरोधी बाकावर असताना जे आमच्यासोबत आंदोलन करण्यासाठी उभे राहत होते, तेच नेते आता विदर्भ राज्याच्या विरोधात भूमीका मांडताना दिसून येत आहेत. विदर्भ राज्याशिवाय विकास नाही, हे सर्वसामान्यांना कळल्याशिवाय विदर्भाचा आंदोलनाला यश येणार नाही, असेही रंजना मामर्डे यावेळी म्हणाल्या.
याप्रसंगी विष्णू आष्टीकर, राजेंद्रसिंह मडकाम, अनिल तिडके, अनिल भोसले विदर्भ यात्रेतील आदी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर विदर्भ गर्जना यात्रा ही आरमोरीकडे सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास रवाना झाली. सभेदरम्यान देसाईगंज शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)