सात कर्मचाऱ्यांवर एसटी विभागीय कार्यालयाचा भार

By Admin | Updated: January 8, 2015 22:55 IST2015-01-08T22:55:19+5:302015-01-08T22:55:19+5:30

एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या एसटीच्या विभागीय कार्यालयाचे काम चंद्रपूर येथूनच सांभाळले जात असून या ठिकाणी केवळ आता सात कर्मचारी कार्यरत आहेत.

The weight of the ST departmental office on seven employees | सात कर्मचाऱ्यांवर एसटी विभागीय कार्यालयाचा भार

सात कर्मचाऱ्यांवर एसटी विभागीय कार्यालयाचा भार

गडचिरोली : एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या एसटीच्या विभागीय कार्यालयाचे काम चंद्रपूर येथूनच सांभाळले जात असून या ठिकाणी केवळ आता सात कर्मचारी कार्यरत आहेत.
गडचिरोली वगळता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एसटी विभागाने स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन केले आहे. मात्र जिल्ह्याची निर्मिती होऊन ३० वर्षांचा कालावधी लोटला तरी गडचिरोली येथे विभागीय कार्यालय नव्हते. त्यामुळे गडचिरोली येथे विभागीय कार्यालय स्थापन करावे, यासाठी एसटी प्रशासनावर दबाव वाढत गेल्यानंतर मागील वर्षी २६ जानेवारी रोजी गडचिरोली येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले.
विभागीय कार्यालयात आस्थापना शाखा, लेखा शाखा, वाहतूक शाखा, सुरक्षा शाखा, सांख्यीकी शाखा, स्थापत्य शाखा असणे आवश्यक आहे. यासाठी गडचिरोली येथील विभागीय कार्यालयात ६० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी केवळ आस्थापना शाखेचे सहा कर्मचारी व लेखा विभागाचा एक कर्मचारी असे एकूण केवळ सात कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. या सात कर्मचाऱ्यांना संपूर्ण विभागीय कार्यालयाचा कारभार सांभाळणे अशक्य असल्याने बहुतांश कामे चंद्रपूर येथूनच केली जातात. या ठिकाणी केवळ रजा व पगारवाढ ही दोनच कामे केली जात आहेत. त्यामुळे येथील विभागीय कार्यालय केवळ नावापुरतेच असल्याची टीका केली जात आहे. विशेष म्हणजे कार्यालय सुरू झाले. त्यावेळी या ठिकाणी बारा कर्मचारी कार्यरत होते. आता केवळ सात कर्मचारी शिल्लक आहेत. एवढेच नाही तर वाहतूक नियंत्रकाचा प्रभार चंद्रपूर येथील मोटार यंत्र अभियंता एम. के. सहारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
येथील विभागीय कार्यालयाला स्वतंत्र इमारत नाही. एका लहानशा इमारतीमध्ये विभागीय कार्यालय चालविले जात आहे. विभागीय कार्यालयासाठी प्रशस्त जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालय चंद्रपूर येथे हलविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एसटीने या ठिकाणी प्रशस्त इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
विभागीय कार्यालय चंद्रपूर येथे गेल्यास पुन्हा ते गडचिरोली येथे आणणे अशक्य आहे. चंद्रपूरवरून गडचिरोली येथे ये-जा करणारे काही कर्मचारी व अधिकारीच चंद्रपूर येथे कार्यालय हलविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कार्यालय हलविण्यास तीव्र विरोध करावा, अशीही मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The weight of the ST departmental office on seven employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.