एका ग्रेडरकडे चार केंद्रांचा भार

By Admin | Updated: January 26, 2017 01:48 IST2017-01-26T01:48:08+5:302017-01-26T01:48:08+5:30

गडचिरोली जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

The weight of four centers with a grader | एका ग्रेडरकडे चार केंद्रांचा भार

एका ग्रेडरकडे चार केंद्रांचा भार

अधिकारी व कर्मचाऱ्यांची ७२ पदे रिक्त : आदिवासी विकास महामंडळात मनुष्यबळाचा अभाव
दिलीप दहेलकर   गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत सहकारी संस्थांमार्फत करण्यात येत असलेल्या धान खरेदीची प्रक्रिया व्यापक स्वरूपाची आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळात उपप्रादेशिक व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांची एकूण ७२ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे एक प्रतवारीकार (गे्रडर) चार ठिकाणच्या धान खरेदी केंद्राचा कारभार सांभाळत आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सहकारी संस्थांचे अनेक धान खरेदी केंद्र दुर्गम भागात असून लांब अंतरावर आहेत. या केंद्राचा कारभार पाहून ग्रेडरना मुख्यालयी उपप्रादेशिक कार्यालयाच्या ठिकाणी जावे लागते.

आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली येथे प्रादेशिक कार्यालय आहे. तर कुरखेडा, घोट, धानोरा, आरमोरी व कोरची येथे उपप्रादेशिक कार्यालय आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सर्व कार्यालये मिळून उपप्रादेशिक व्यवस्थापकाची एकूण चार पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ एक पद भरण्यात आले असून तीन पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. व्यवस्थापक (प्रशासकीय) एक पद रिक्त आहे. उपव्यवस्थापकाचे एकूण चार पदे मंजूर असून दोन पदे भरण्यात आली आहे. तर दोन पदे रिक्त आहे. लेखापालचे सात पदे मंजूर असून तीन पदे भरण्यात आली आहे. चार पदे रिक्त आहेत. सहायक व्यवस्थापकाचे एक पद भरण्यात आले असून एक पद रिक्त आहे.
वरिष्ठ सहायकाच्या तीन पदांपैकी एक पद भरण्यात आले असून दोन पदे रिक्त आहेत. वरिष्ठ सहायकाची एकूण ११ पदे मंजूर आहेत. यापैकी आठ पदे भरण्यात आली असून तीन पदे रिक्त आहेत. टंकलिपिकाचे सहा पदे मंजूर असून दोन पदे भरण्यात आली आहेत. चार पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. गोदामपालच्या पाच पदांपैकी तीन पदे भरण्यात आली असून दोन पदे रिक्त आहेत.
ट्रॅक्टरचालकाचे दोन पदे तर वाहनचालकाचे पाच पदे रिक्त आहेत. क्लिनर एक व रखवालदाराचे चार पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत एकूण १२० पदे मंजूर आहेत. यापैकी ४८ पदे भरण्यात आली असून ७२ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्र दुर्गम भागात आहेत. मात्र ग्रेडर कमी असल्याने कामकाज मंदावले आहे.

राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली प्रादेशिक कार्यालय तसेच पाच उपप्रादेशिक कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. तसेच अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गतही विविध पदे रिक्त आहेत. रिक्तपदे भरण्यात यावी, अशी मागणी सातत्याने शेतकरी बांधवांकडून होत आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्याकडे राज्य शासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.

कनिष्ठ सहायकाची सर्वच पदे रिक्त
गडचिरोली प्रादेशिक कार्यालय तसेच कुरखेडा, घोट, धानोरा, आरमोरी व कोरची उपप्रादेशिक कार्यालय मिळून कनिष्ठ सहायक/विक्रेत्याची एकूण सहा पदे मंजूर आहेत. एकही पद भरण्यात आली नसून सर्वच सहा पदे गेल्या महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे सदर पदाचा प्रभार इतर कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. गडचिरोली कार्यालयात दोन, कुरखेडा दोन, धानोरा एक, घोट एक, आरमोरी व कोरचीमध्ये एक-एक पद रिक्त आहे.

विपणन निरीक्षक मिळेना
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा येथील उपप्रादेशिक कार्यालयात विपणन निरीक्षकांचे चार, कुरखेडा चार, घोट चार, धानोरा तीन, आरमारी तीन व कोरची उपप्रादेशिक कार्यालयात तीन अशी एकूण १७ पदे मंजूर आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही १७ ही पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास महामंडळाकडे गडचिरोली जिल्ह्यात एकही विपणन निरीक्षक स्थायी स्वरूपात कार्यरत नाही. त्यामुळे धान खरेदीच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.

प्रतवारीकाराचे १५ पदे रिक्त
गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत पाचही उपप्रादेशिक कार्यालयात प्रतवारीकार (ग्रेडरची) एकूण ३० पदे मंजूर आहेत. यापैकी १५ पदे भरण्यात आली असून १५ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामध्ये कुरखेडा कार्यालयाअंतर्गत दोन, घोट कार्यालयाअंतर्गत आठ, धानोरा दोन, आरमोरी दोन व कोरची उपप्रादेशिक कार्यालयात प्रतवारीकाराचे एक पद रिक्त आहे. पुरेसे प्रतवारीकार नसल्याने एका प्रतवारीकाराकडे चार धान खरेदी केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मुख्यालय असलेले उपप्रादेशिक कार्यालयातही या ग्रेडर यांना काम करावे लागत आहे. चार केंद्रांवर येरझारा मारून उपप्रादेशिक कार्यालय गाठावे लागते.
 

Web Title: The weight of four centers with a grader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.