आठवडी बाजारातील उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 01:56 IST2016-11-14T01:56:26+5:302016-11-14T01:56:26+5:30

८ नोव्हेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या.

Weekly market turnover slowed down | आठवडी बाजारातील उलाढाल मंदावली

आठवडी बाजारातील उलाढाल मंदावली

भाजीपाला विक्रीत घट : ५०० व १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्याचा परिणाम
गडचिरोली : ८ नोव्हेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या. यामुळे १०० च्या नोटा व सुट्या पैशांचा प्रचंड तुटवडा जिल्हाभरात निर्माण झाला आहे. नव्या नोटा काढण्यासाठी तसेच ५०० व १००० च्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी ग्राहकांची बँकेसमोर गर्दी होत आहे. ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यामुळे गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावली असल्याचे दिसून आले. अनेक विक्रेत्यांनी नेहमीपेक्षा आज ५० टक्केच व्यवसाय केल्याचे विक्रेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे.
गडचिरोलीच्या आठवडी बाजारात अनेक ग्राहक ५०० व १००० च्या जुन्या नोटा घेऊन भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी आले होते. त्यांनी सदर नोटा खपवून साहित्य खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील विक्रेत्यांनी सदर ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी त्यांच्याजवळ असलेल्या १०० ते १५० रूपयांतच मिळेल तेवढा भाजीपाला खरेदी केला. प्रत्येक आठवडी बाजारात अडीचशे रूपयांचा भाजीपाला घेणाऱ्या अनेक ग्राहकांनी आज १०० रूपयांतच भाजीपाल्याची खरेदी आटोपली तसेच काही मोजके ग्राहक अनेक दुकानावरून भाजीपाला खरेदी न करता परतले. दुकानदारांशी सदर प्रतिनिधीने संवाद साधल्यानंतर ग्राहकाकडून ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारणे बंद केल्याची माहिती त्यांनी दिली. १०० रूपयाच्या नोटांच्या तुटवड्यामुळे सदर आठवडी बाजारात भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी दिसून आली. एकूणच नोटा बंदच्या निर्णयाने आठवडी बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावल्याचे दिसून आले. (स्थानिक प्रतिनिधी)

केंद्र सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे नागपूरच्या ठोक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांकडून सदर नोटा स्वीकारणे बंद केले आहे. उधारीवर माल न्या, मात्र ५०० व १००० च्या जुन्या नोटा देऊ नका, असे ठोक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला सांगत आहेत. सदर नोटा बंद केल्याने भाजीपाला विक्रीत घट आली आहे.
- देविदास लांजेवार, भाजीपाला विक्रेते, ब्रह्मपुरी

५०० व १००० च्या जुन्या नोटा घेऊन आलेल्या ग्राहकांना आपण भाजीपाल्याची विक्री केली नाही. सदर नोटा ठोक व्यापारी घेत नसल्याने या नोटा स्वीकारून बँकेत रांगेमध्ये लागणे परवडेजोगे नाही. बाजार व इतर कामे सोडून बँकेत जाण्यासाठी सवडही नाही. त्यामुळे आपण जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून खरेदी कमी झाली.
- दामदेव मेश्राम, भाजीपाला विक्रेते, गांगलवाडी

केंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने आठवडाभरापासून अनेक ठिकाणच्या आठवडी बाजारात साहित्य विक्री कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून आपण कापड विक्रीत अर्धाच व्यवसाय केला आहे. १०० व ५० च्या नोटांचा तुटवडा असल्याने अनेक ग्राहक खरेदी विना परत गेले.
- विजय गुलदेवकर, रेडिमेड कापड विक्रेते, गडचिरोली

Web Title: Weekly market turnover slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.