काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील यात्रा, मंड्या, आठवडी बाजार भरविण्यास बंदी घातली. त्यामुळे जिल्हाभरातील आठवडी बाजार व सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही धानाेरा येथे गुरूवारी आठवडी बाजार भरविण्यासाठी बाहेरगावाहून अनेक भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, कापड विक्रेते, खेळणी, चप्पल विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते आदींनी दुकाने थाटली हाेती. याची माहिती मुख्याधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी आपल्या चमूसह बाजारात येऊन दुकाने बंद करायला लावली. यावेळी अनेक विक्रेत्यांशी शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याने आपण काहीच करू शकत नसल्याचे मुख्याधिकारी बेंबरे यांनी सांगितले. तसेच त्यांची समजूत घातल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. यावेळी काही दुकानदार गावाला परत गेले, परंतु भाजीपाला घरी नेऊन करणार काय, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला. त्यानंतर काही विक्रेत्यांनी शक्कल लढवून वाॅर्डावाॅर्डात माेकळ्या जागेच्या साेयीनुसार आपली दुकाने लावली. त्यामुळे धानोरा येथील नागरिकांची भाजीपाल्याची गरज पूर्ण झाली. परंतु धानोरा येथे बाहेरील विक्रेते न आल्यास त्याचा गैरफायदा स्थानिक विक्रेते घेतात. दुप्पट भावाने भाजीपाला विक्री करतात. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. आधीच महागाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. त्यातच अधिक भावाने भाजीपाला खरेदी करावी लागल्यास महागाईमध्ये आणखी भर पडते. त्यामुळे जादा दराने भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी धानाेरा येथील गृहिणींकडून केली जात आहे.
बाॅक्स
भवरागड यात्रा रद्द
धानाेरा तालुक्यातील साेडे येथील नदी तीरावर भवरागड देवस्थानात हाेळी सणाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी मोठी यात्रा भरते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाची भीती असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली. साधेपणाने पूजन करण्यात आले. तरी गुरूवारी यात्रेच्या दिवशी काही विक्रेत्यांनी नदीमध्ये दुकाने लावली होती. याची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह नदी गाठून दुकाने बंद करायला लावली.