तुमच्या साथीला आम्ही, जहर खाऊ नको बाबा !

By Admin | Updated: December 19, 2015 01:35 IST2015-12-19T01:35:10+5:302015-12-19T01:35:10+5:30

विदर्भासह महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनोधैर्य मजबूत करण्यासाठी ...

We should not eat poison, Dad! | तुमच्या साथीला आम्ही, जहर खाऊ नको बाबा !

तुमच्या साथीला आम्ही, जहर खाऊ नको बाबा !

कुरखेडा : विदर्भासह महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनोधैर्य मजबूत करण्यासाठी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी पुढाकार घेतला आहे. श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडाच्या रौप्य महोत्सवी समारोप कार्यक्रमप्रसंगी आयोजित सखे साजणी या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले,
घोर मनाला लावू नको,
पाठ जगाला दावू नको
तुमच्या साथीला आम्ही,
आहो बाबा जहर खाऊ नको
याच कार्यक्रमात देशाच्या वर्तमानात पुरूषांच्या बरोबरीने राखीव जागांवर महिलांनी हक्क जमविला आणि पुरूषाची राजकीय बेकारी निर्माण झाली. आता महिला घराबाहेर पडू लागल्याने पुरूषाच्या मक्तेदारीला कसा धक्का बसला, याचे चित्र प्रा. वाकुडकर यांनी आपल्या खास शैलीत रेखाटतांना ते म्हणाले,
नशीब आपलं, उताण झोपलं,
जीवाची फजीती ऐका
भाऊ, मर्दाला इज्जत हाय का?
आता सरपंच झाल्या बायका
याशिवाय वाकुडकरांनी प्रेम श्रृंगार, राजकीय विडंबन, समाजातील अनिष्ठ व कालबाह्य परंपरा, गझल, लावणी यांच्यावरही मनसोक्त उधळण केली.
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात
माझं ईवलंस गाव
तुझी झेप वादळाची,
माझी तुझ्यावर धाव
असे सांगताना प्रेयसीचे लाजणे, दूर दूर सरणे आदी प्रेमातील बारकावे त्यांनी काव्याच्या माध्यमातून उलगडून टाकले. देशातील क्रांतिवीरांच्या फोटो शाळा, महाविद्यालय व सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर दिसत नाही. हे सांगताना ते म्हणाले,
देश आझाद करण्यासाठी
कोणाचे रक्त सांडले,
कोण फासावर चढले
अन् पुतळे कुणाचे उभारले
एकूणच सखे साजणीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरही प्रा. वाकुडकरांनी चिंता व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: We should not eat poison, Dad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.