टिप्पागड किल्ला कोसळण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: November 13, 2015 01:29 IST2015-11-13T01:29:58+5:302015-11-13T01:29:58+5:30
कोरचीपासून ४० किमी अंतरावर निहायकल गावाजळील चार किमी अंतरावरचा टिप्पागड किल्ला सध्या कोसळण्याच्या स्थितीत आहे.

टिप्पागड किल्ला कोसळण्याच्या मार्गावर
१६ व्या शतकातील वास्तू : पुरातत्व विभागाचे देखभाल, दुरूस्तीकडे होत आहे दुर्लक्ष
कोरची : कोरचीपासून ४० किमी अंतरावर निहायकल गावाजळील चार किमी अंतरावरचा टिप्पागड किल्ला सध्या कोसळण्याच्या स्थितीत आहे. १६ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या किल्ल्याच्या देखभाल दुरूस्तीकडे राज्य शासनाचे व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष आहे.
निहायकल या १०० लोकवस्तीच्या गावापासून चार किमी अंतरावर टिप्पागड किल्ला आहे. येथूनच किल्ल्यावर पायी जावे लागते. मध्ये दोन लहान नालेही लागतात. मात्र चार किमीच्या पायवाटेशिवाय या किल्ल्याला जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. गडाजवळ पोहोचताच दगडाने बांधलेल्या सुरक्षा भिंती येथे दिसतात. सात ते आठ किमी लांबीची ही सुरक्षा भिंत मोडकळीस आली आहे. डोंगरमाथ्यावर सुरक्षा भिंतीच्या आत गेल्यावर सरासरी २.५ हेक्टर परिसरात तलाव आहे. बाराही महिने या तलावाला पाणी राहते. शिखरावर चढताना बऱ्याचशा गुफा येथे लागतात. शिखरावर समुद्रसपाटीपासून तीन हजार ५०० मिटर उंचावर गुरूबाबाची गुफा आहे. राजे पुरणशहा यांचे ते गुरू होते. ५०० वर्षांपूर्वी पुरणशहा राज्याचे कुटुंब या किल्ल्यात वास्तव्याला होते. गुफेच्या आतमध्ये १० ते १२ चौरस फूट जागा असून या ठिकाणी आदिवासींच्या देवता आहेत. तेथे पुजाही केली जाते. मात्र सध्या या किल्ल्याची दूरवस्था झाली असून किल्ला कधीही कोसळेल अशा स्थितीत आलेला आहे. टिप्पागड, वैरागड येथे जिल्ह्यात किल्ले आहेत. या किल्ल्याच्या विकासाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे, अशी जनतेची मागणी आहे. त्यांना पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)