बैलबंडीद्वारे ड्रमातून होत आहे पाणी पुरवठा
By Admin | Updated: April 20, 2016 01:41 IST2016-04-20T01:41:58+5:302016-04-20T01:41:58+5:30
देसाईगंज तालुक्यातील मोहटोला-किन्हाळा भागातील गाढवी नदीसह तलाव, बोड्या कोरड्या पडल्याने या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

बैलबंडीद्वारे ड्रमातून होत आहे पाणी पुरवठा
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील मोहटोला-किन्हाळा भागातील गाढवी नदीसह तलाव, बोड्या कोरड्या पडल्याने या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी मोहटोला व किन्हाळा या गावातील नागरिकांना बैलबंडीद्वारे ड्रमातून मोटारपंपवरून गावात पाणी आणावे लागत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनासह साऱ्याच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
देसाईगंज तालुका हा प्रगत समजला जातो. तालुक्याच्या गाढवी नदीच्या अलिकडील भागात इटिया डोह धरणाचे पाणी येत असते. मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. यापूर्वी इटिया डोह धरणाच्या पाण्यामुळे संपूर्ण देसाईगंज तालुक्यात पाण्याची मुबलक व्यवस्था होत असून या भागातील विहीर व हातपंपाची पाण्याची पातळी चांगली राहत होती.
मात्र यंदा एप्रिल महिन्यात तालुक्यातील सर्व जलस्त्रोतांनी तळ गाठल्यामुळे मे महिन्यात पाणी संकट तीव्र होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. गाढवी नदीच्या पलिकडील भागातील शिवराजपूर, फरी, मोहटोला, विहीरगाव, डोंगरगाव (हलबी), पोटगाव या गावालगतचे तलाव पूर्णत: कोरडे पडले आहे. डिसेंबर महिन्यातच या भागातील तलावातील पाणीसाठा अत्यल्प शिल्लक होता. याचा परिणाम गावातील विहीर व हातपंप स्त्रोतावर झाला. भिषण पाणी टंचाईचा सर्वात जास्त त्रास या भागातील महिलांना होत आहे. अनेक नागरिक बैलबंडीवर पाण्याचे ड्रम मांडून आपल्या पाळीव जनावरांसाठी तसेच आंघोळीसाठी शेतकऱ्यांच्या पंपावरून पाणी आणत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. बहुतांश महिला कपडे धुण्यासाठी कृषी पंपाच्या पाण्याचा आधार घेत आहे.
मोहटोला-किन्हाळा भागातील काही ग्रामपंचायतींनी कुपनलिकेवर पंप बसवून त्यातील पाणी विहिरीत सोडून गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. एप्रिल महिन्यात इतकी भिषण परिस्थिती असताना मे महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे कुपनलिकेतील पाण्याची पातळी प्रचंड खालावण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)