३०० गावांत सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2015 01:13 IST2015-05-07T01:13:17+5:302015-05-07T01:13:17+5:30

राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यात वीज नसलेल्या गावात सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ लघु पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

Water supply to solar water in 300 villages | ३०० गावांत सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

३०० गावांत सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

दिलीप दहेलकर गडचिरोली
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यात वीज नसलेल्या गावात सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ लघु पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३०० हून अधिक गावात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू असून कार्यान्वित करण्यात आलेल्या गावातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लागली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी या योजनेकडे आता जिल्ह्यातील अनेक दुर्गम, आदिवासीबहुल गावांचा कल वाढला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत गडचिरोली जिल्ह्यात २००८-०९ पासून सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात विद्युतवर सहा गावात सदर लघु नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर २००९-१० मध्ये १२ गावात विद्युतीकरणाद्वारे सदर योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर २०१०-११ या वर्षात विद्युतीकरणावर ५१ तर सौरऊर्जेवर ५२ गावात लघु नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.
या योजनेची माहिती दुर्गम व अतिदुर्गम गावातील ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर या योजनेकडे छोट्या गावांचा कल वाढला. परिणामी २०११-१२ या वर्षात सौरऊर्जेवर आधारित जिल्ह्यातील तब्बल २०० गावात सदर लघु नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. २०११-१२ या वर्षात सदर योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या गावांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सहा, आरमोरी तालुक्यातील ३४, कुरखेडा १३, धानोरा २२, चामोर्शी ३१, अहेरी १४, एटापल्ली २२, सिरोंचा १७, कोरची १०, देसाईगंज ८, मुलचेरा १० व भामरागड तालुक्यातील १३ गावांचा समावेश आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत २०१३-१४ या वर्षात सौरऊर्जेवर दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात २०१३-१४ या वर्षात जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करून नियोजन करण्यात आले. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या वर्षात नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळण्यास विलंब झाला. २०१२-१३ च्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २६२ गावात सदर योजना कार्यान्वित करून गावकऱ्यांसाठी पाणीपुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यानंतर २०१४ च्या मे महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील ६१ गावात सदर योजना राबविण्यासाठी मंजुरी मिळाली. प्रत्येक गावात एक काम याप्रमाणे ६१ काम घेण्यात आले. यामध्ये आरमोरी तालुक्यात ९, भामरागड ४, चामोर्शी ५, एटापल्ली ११, गडचिरोली २, कोरची ८, कुरखेडा २, सिरोंचा ३, देसाईगंज, अहेरी तालुक्यात एका कामाचा समावेश आहे. तर धानोरा तालुक्यात सर्वाधिक १६ गावांचा समावेश आहे. भामरागड, अहेरी व सिरोंचा तालुक्यात सौरऊर्जेवरील लघु नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही सुरू झाले नाही. आरमोरी, चामोर्शी, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा व सिरोंचा आदी तालुक्यातील मंजूर असलेल्या गावात दुहेरी पंप बसवून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. या योजनेमुळे दुर्गम आदिवासी गावांमध्ये पाण्याची सुविधा झाली आहे.
वीज बिलाचा प्रश्नच नाही
थकीत विद्युत बिलामुळे जिल्ह्यात जवळपास २० मोठ्या नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. ग्रा. पं. प्रशासनाने विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने नळ योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. विद्युतच्या लपंडावामुळे विद्युकीकरणावरील नळ योजना वारंवार अडचणीची ठरते. मात्र सौरऊर्जेवरील लघु नळ पाणीपुरवठा योजनेत ग्रा. पं. ला विद्युत बिलाचा प्रश्न उद्भवत नाही.
योजनेसाठी या गोष्टी आवश्यक
सौरऊर्जेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी संबंधित ग्राम पंचायतीचे मागणीपत्र आवश्यक आहे.
योजना कार्यान्वित करण्याबाबतचा ग्राम पंचायतीचा ठराव आवश्यक आहे.
सदर नळ पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी स्वीकारण्याबाबत ग्राम पंचायतीने हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.
प्रतितास दोन हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली विहीर अथवा पाण्याचे स्त्रोतासोबतच गुणवत्ता पूर्ण पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Web Title: Water supply to solar water in 300 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.