पाणीपुरवठा आॅक्सीजनवर
By Admin | Updated: July 15, 2014 00:00 IST2014-07-15T00:00:04+5:302014-07-15T00:00:04+5:30
येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने याचा फटका या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे.

पाणीपुरवठा आॅक्सीजनवर
रिक्त पदे : अहेरी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
अहेरी : येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने याचा फटका या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे.
अहेरी परिसरातील पाणीपुरवठा योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहेरी येथे उपविभागीय पाणीपुरवठा कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने दुसऱ्या पाणीपुरवठा योजनांवर नियंत्रण ठेवण्याचे सोडाच या कार्यालयाचे स्वत:वरच नियंत्रण राहिलेले नाही. उपविभागीय अधिकारी म्हणून पी. आर. मडावी हे कार्यरत आहेत. मात्र ते कार्यालयात नेमके कधी येतात व कधी जातात, याचा पत्ताच या कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना लागत नाही. एखाद्या नागरिकाने मडावी यांच्याबद्दल चौकशी केल्यास ते दौऱ्यावर आहेत किंवा बैठकीसाठी गडचिरोली, नागपूर येथे गेले आहेत, असे उत्तर येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते. त्यामुळे आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. महत्वाचे म्हणजे ते अहेरी येथे मुख्यालयी न राहता चंद्रपूर येथून ये-जा करतात.
जिल्हा परिषदेमध्ये १२ वर्षापूर्वी पाणीपुरवठा विभाग सुरू झाला. तेव्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी काही कर्मचारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळाले.सध्य:स्थितीत या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची ६ पदे रिक्त आहेत. ४ कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. यापैकी २ पदे नियमित असून २ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. कनिष्ठ लिपिकाचे ३ पदे मंजूर आहेत, तिनही पदे रिक्त आहेत. परिचराच्या २ पदांपैकी १ पद रिक्त आहे. रिक्त पदांमुळे कामाचा खोळंबा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने काही कर्मचारी परत घेतल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे.
लिपिकाचे पदे रिक्त असल्याने कनिष्ठ अभियंता जे. जी. भलावी यांना लिपिकाचे काम करावे लागत आहे. संगणकाची सुविधा उपलब्ध नाही. कनिष्ठ अभियंता स्वत:च्या लॅपटॉपवरून अतिमहत्वाची कामे व पत्र व्यवहार करीत आहेत. कार्यालयात असलेल्या वॉलमॅन यांना लिपिकाचे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.
दरवर्षीच नवनवीन पाणीपुरवठा योजना बांधल्या जातात. त्यामुळे या विभागाच्या जबाबदारीत दरवर्षी भर पडत आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन वेळेवर मिळत नाही. परिणामी अहेरी उपविभागातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)