आलापल्लीसह नऊ गावांचा पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: August 22, 2015 01:49 IST2015-08-22T01:49:23+5:302015-08-22T01:49:23+5:30
प्रादेशिक पाणीपुरवठा केंद्राच्या शुद्धीकरण केंद्रात जवळपास आठ फूट एवढा प्रचंड गाळ साचल्याने सदर योजना मागील सात दिवसांपासून बंद पडली आहे.

आलापल्लीसह नऊ गावांचा पाणीपुरवठा ठप्प
सात दिवसांपासून पाणी संकट : शुद्धीकरण केंद्रात आठ फुटांचा गाळ
अहेरी : प्रादेशिक पाणीपुरवठा केंद्राच्या शुद्धीकरण केंद्रात जवळपास आठ फूट एवढा प्रचंड गाळ साचल्याने सदर योजना मागील सात दिवसांपासून बंद पडली आहे. परिणामी आलापल्लीसह नऊ गावांचा पाणीपुरवठा ठप्प पडला आहे.
अहेरी तालुक्यातील आलापल्ली, चेरपल्ली, कोत्तूर, गडअहेरी, भुजंगराव पेठा, वांगेपल्ली, किष्टापूर, चिंचगुंडी या गावांना अहेरी प्रादेशिक पाणीपुरवठा केंद्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी गढूळ येत असल्याने शुद्धीकरण केंद्रात या कालावधीत सर्वाधिक गाळ जमा होते. त्यामुळे त्याचा एका नियमित कालावधीनंतर उपसा करणे आवश्यक होते. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ उपसला नाही. परिणामी आठ ते नऊ फूट उंचीचा गाळाचा थर शुद्धीकरण केंद्राच्या टाक्यांमध्ये जमा झाला आहे. गाळ साचल्याने मागील सात दिवसांपासून आलापल्लीसह इतर नऊ गावांचा पाणीपुरवठा ठप्प पडला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या गावांमध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना विहीर व हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र तत्काळ सुरू करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अहेरीचे प्रभारी उपविभागीय अभियंता जी. डी. बारापात्रे यांना विचारणा केली असता, मजूर लावून गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)