आलापल्ली शहराचा पाणीपुरवठा बंदच राहणार
By Admin | Updated: March 6, 2016 01:04 IST2016-03-06T01:04:36+5:302016-03-06T01:04:36+5:30
आलापल्ली ग्रामपंचायतीकडे सुमारे २६ लाख ५८ हजार ९०२ रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या थकीत पाणीपट्टीमुळे पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे.

आलापल्ली शहराचा पाणीपुरवठा बंदच राहणार
२६ लाखांची पाणीपट्टी थकीत
अहेरी : आलापल्ली ग्रामपंचायतीकडे सुमारे २६ लाख ५८ हजार ९०२ रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या थकीत पाणीपट्टीमुळे पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे पाणी योजना दुरूस्त होऊनही आलापल्ली शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता जी. डी. बारापात्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
आलापल्लीसह गेर्रा, वांगेपल्ली, क्रिष्णापूर, चिचगुडी, चेरपल्ली, गडअहेरी, गुप्पा या आठ गावांना ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या मार्फतीने पाणीपुरवठा केला जातो. विद्युत रोहित्रावर वीज कोसळल्याने चार दिवसांपासून सदर पाणीपुरवठा योजना बंद पडली होती. त्यामुळे पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला होता. परिणामी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेऊन रोहित्र दुरूस्त केला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा शनिवारी पूर्ववत झाला. रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. मात्र हा पाणीपुरवठा आलापल्ली वगळता इतर सात गावांना केला जाणार आहे.
आलापल्ली ग्रामपंचायतीकडे मागील अनेक वर्षांपासून पाणीपट्टी कर थकीत आहे. पाणीपट्टीची रक्कम भरण्यात यावी, याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतीला अनेकवेळा पत्र लिहिले आहे. मात्र पाणीपट्टी भरण्याबाबत ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही. यापूर्वी १४ जानेवारी रोजी नोटीस पाठवून २५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत या कार्यालयास थकीत पाणीपट्टी भरण्यात यावी, अन्यथा २६ फेबु्रवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. अचानक पावसामुळे रोहित्र जळाल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडली होती. सदर योजना शनिवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र आलापल्ली शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार आहे.
याबाबत आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे यांना विचारणा केली असता, थकलेली पाणीपट्टी दोन वर्षांपूर्वीचे आहे. टप्प्याटप्याने पाणीपट्टीचा भरणा केला जाईल. पाणी ही अत्यावश्यक गरज असल्याने पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी प्रतिक्रिया लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)