कुमकोड येथे पाणीटंचाई तीव्र
By Admin | Updated: April 27, 2015 01:12 IST2015-04-27T01:12:19+5:302015-04-27T01:12:19+5:30
तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या कुमकोड येथील दोनपैकी एक हातपंप बंद आहे.

कुमकोड येथे पाणीटंचाई तीव्र
कोरची : तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या कुमकोड येथील दोनपैकी एक हातपंप बंद आहे. तर गावात एकमेव असलेल्या विहिरीमध्येही गाळ साचला असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.
कुमकोड येथे २३ घरांची वस्ती असलेले गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १५० आहे. गावात महादंतेश्वरी देवस्थान असून या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भावीक येतात. या देवस्थानामुळेच या गावाचे महत्त्व वाढले आहे. मात्र या गावात सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. गावामध्ये एकच इंग्रजकाळात बांधण्यात आलेली विहीर असून मागील अनेक वर्षांपासून या विहिरीतील गाळाचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे सदर विहीर बुजण्याच्या मार्गावर असून जलस्त्रोतही कमी झाले आहेत. दोन पैकी एक हातपंप बंद असून सुरू असलेल्या हातपंपाला दूषित पाणी येथे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये या गावातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने गावातील नागरिकांनी विहिरीची डागडुजी करावी व हातपंप दुरूस्त करावा, अशी मागणी केली. मात्र प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
गावातील नागरिकांना एक किमी अंतरावर असलेल्या खासगी विहिरीतून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. गावामध्ये नालीसाठी खोदकाम करण्यात आले. मात्र बरेच दिवस उलटूनही नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. गावात विजेचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु ट्रान्सफॉर्मरला ग्रिप नसल्याने डायरेक्ट विजेचा पुरवठा केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)