पाण्यासाठी जनावरांची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:43+5:302016-04-03T03:50:43+5:30

गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे.

Water for animals | पाण्यासाठी जनावरांची आबाळ

पाण्यासाठी जनावरांची आबाळ

प्रशासन उदासीन : मर्देहूर गावात नागरिक स्त्रोतातून पाणी काढून पाजत आहेत
भामरागड : गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. तर भामरागड तालुक्यात अनेक दुर्गम गावात पाळीव व जंगली जनावरांना पिण्यासाठी परिसरात पाणी राहिलेले नसल्याने परिस्थिती आणखीणच कठीण झाली आहे.
भामरागड तालुक्याच्या अनेक दुर्गम गावात लोकमत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, विदारक परिस्थिती दिसून आली. तालुक्यातील मर्देहूर अरण्य परिसरातील गाव आहे. येथे जनावरांना पिण्यासाठी पाणी नागरिकांना दूर अंतरावरून आणून त्यांना पाणी पाजावे लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्थितीत आहे. गावाजवळ कुठेही पाण्याचे जलस्त्रोत नाहीत. गावातील हातपंपाचे पाणी काढून त्याची साठवणूक करावी लागत आहे व त्यातून पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमान वाढवू लागले असल्याने जंगलातील पाणवठे व जलस्त्रोत आटलेत. दुसरी कुठलीही व्यवस्था जनावरांच्या पाण्यासाठी नाही. गावातील बोअरवेलजवळच नागरिकांनी लाकूड टाकून जनावरांच्या पिण्यासाठी पाणवठा तयार केला आहे व पाणवठ्यात गावकरी दररोज पाणी भरून ठेवतात. त्यातून जनावरांची सोय झाली आहे. सदर गावात गाव तलाव मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.
भामरागड तालुक्याच्या १२८ पैकी साधारणत: ७० ते ८० गावात अशी स्थिती असून एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण होण्याची स्थिती आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही हालचाली पाणी टंचाई समस्या सोडवणुकीसाठी करण्यात आलेल्या नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Water for animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.