कचरा व्यवस्थापन काम थंडच
By Admin | Updated: July 9, 2014 23:26 IST2014-07-09T23:26:03+5:302014-07-09T23:26:03+5:30
गडचिरोली या जिल्हा मुख्यालयातील शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुका मुख्यालयात कचरा व्यवस्थापनाबाबत कायम उदासिनता बाळगली जात आहे. शहरातील व गावातील कचरा जमा करून कुठेतरी

कचरा व्यवस्थापन काम थंडच
गडचिरोली : गडचिरोली या जिल्हा मुख्यालयातील शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुका मुख्यालयात कचरा व्यवस्थापनाबाबत कायम उदासिनता बाळगली जात आहे. शहरातील व गावातील कचरा जमा करून कुठेतरी फेकून दिला जातो. या कचऱ्यावर दिवसभर जनावरे तसेच भंगार जमा करणारे लोक गर्दी करतात. तसेच शहरामध्ये दुकानदार लोक आपले दुकान बंद करतांना कचरा रस्त्याबाहेर वा जवळच्या नालीत ढकलून देतात. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचे काम जिल्ह्यात अजूनही चांगल्या पध्दतीने झालेले नाही. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत असल्याने शहरात साथीचे आजार पसरून जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
क वर्गाचा दर्जा असलेल्या गडचिरोली पाालिकेतर्फे शहरात रोज स्वच्छता मोहीम राबविली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु अनेक वॉर्डांमध्ये मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढिगारे साचलेले आढळून येतात. शहरातील मूल मार्गावरील बाजार परिसरात सर्वत्र कचरा पडलेला दिसून येतो. या बाजारातच नगरपालिकेची राजीव गांधी प्राथमिक शाळा आहे. बाजारात केरकचरा व घाणीचे साम्राज्य राहते. याच ठिकाणी रोज या शाळेची मुले खेळत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
याशिवाय शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गुजरी बाजार परिसरातही सडका भाजीपाला व इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भागातील सर्वोदय वॉर्ड, नेहरू वॉर्ड, बेसिक शाळा परिसर व गांधी वॉर्डातील कचरा गुजरी बाजारातच आधी जमा केला जातो. त्यानंतर पालिकेच्या घंटागाडीव्दारे शहरालगत खरपुंडी मार्गावर असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या डेपोत कचरा नेला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच गडचिरोली शहरालगत असलेल्या पोटेगाव मार्गावर कचरा उघड्यावर टाकून ठेवला जातो.
रामनगर, रामपुरी कॅम्प एरिया, पोटेगाव मार्ग व चामोर्शी मार्गावरील वॉर्डामधील जमा झालेला कचरा या भागात उघड्यावर टाकून ठेवण्यात येतो. या कचऱ्यावर जनावरे व डुकरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस दिसून येत असून त्यांच्यामुळेही शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरू वॉर्ड क्रमांक १ मध्ये वस्तीलगतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणाला लागूनच घरे असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गडचिरोली शहरात २३ वॉर्ड असून या सर्वच वॉर्डांमध्ये पालिकेतर्फे घंटागाडीच्या माध्यमातून कचरा जमा करण्याचे काम केले जाते.
सर्व वॉर्डातून जमा झालेला कचरा खरपुंडी मार्गावरील कचरा डेपोत नेवून टाकला जातो. परंतु याठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या डेपोमध्ये सर्वत्र कचरा टाकलेला दिसून येत आहे.
चामोर्शी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कचरा जमा करण्यासाठी घंटा गाडी गावात फिरते. जमा केलेला कचरा गावाबाहेरील खड्ड्यामध्ये जमा केला जातो. परंतु या कामात फारशी नियमितता नाही. त्यामुळे नागरिक नाल्यांमध्येही कचरा, पॉलिथीन ढकलून देतात. अनेक लोक खताच्या ढिगाऱ्यावर कचरा नेऊन टाकतात. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाबाबत फारशी दक्षता घेतली जात नाही. अहेरी राजनगरीचे गाव मोठी ग्रामपंचायत या गावातील कचरा बसस्टँड मार्गावर फेकला जातो. तो तसाच पडून राहतो. या कचऱ्याचे कुठलेही व्यवस्थापन केले जात नाही. आरमोरी गावातही कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावली जात नाही. रामसागर तलाव, पंचायत समितीच्या बाजूला व बसस्थानकाच्या मागील बाजूला गावातील कचरा नेऊन टाकला जातो. (जिल्हा प्रतिनिधी)