चामोर्शी तालुक्यात अनेकांना धोबीपछाड
By Admin | Updated: February 25, 2017 01:25 IST2017-02-25T01:25:32+5:302017-02-25T01:25:32+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा असलेल्या चामोर्शी तालुक्यात भाजपने सहा जागा जिंकत इतर अनेक पक्षांना मोठी धोबीपछाड दिली आहे.

चामोर्शी तालुक्यात अनेकांना धोबीपछाड
काँग्रेसने यंदा खाते उघडले : मुख्यमंत्र्यांच्या सभेचा भाजपला झाला फायदा; गण्यारपवारांचा झंझावात दिसलाच
रत्नाकर बोमीडवार ल्ल चामोर्शी
जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा असलेल्या चामोर्शी तालुक्यात भाजपने सहा जागा जिंकत इतर अनेक पक्षांना मोठी धोबीपछाड दिली आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीत दोन जागा जिंकून चामोर्शी तालुक्यात आपले खाते उघडले आहे. तर अपक्ष म्हणून निवणूक लढणारे अतुल गण्यारपवार यांनीही स्वत:ची जागा कायम राखत इतरांना चारही मुंड्या चित केले.
गतवेळी चामोर्शी तालुक्यातून भाजपचे पाच, राकाँचे तीन व एक अपक्ष सदस्य निवडून आला होता. काँग्रेसला येथे भोपळा फोडता आला नव्हता. अतुल गण्यारपवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडताच चामोर्शी तालुक्यातून पक्षाला गाशाच गुंडाळावा लागला. भाजपने नऊही क्षेत्रामध्ये चांगली हवा निर्माण केली होती. दस्तखुर्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा चामोर्शी येथे घेण्यात आली. मात्र चामोर्शी तालुक्यात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे व अध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या अंजली ओल्लालवार यांचा पराभव या निवडणुकीत झाला. तो पक्षाला जिव्हारी लागणारा आहे. अतुल गण्यारपवारांनी नऊ पैकी सात जि.प. क्षेत्रात आपले उमेदवार उभे केले होते. ते स्वत: १६०० मतांनी निवडून आले. तर काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी काँग्रेसपेक्षा जास्त मताधिक्य मिळविले आहे. विसापूर-कुरूळ, विक्रमपूर-फराडा, दुर्गापूर-वायगाव या क्षेत्रात गण्यारपवारांचे समर्थक उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भेंडाळा-मुरखळा क्षेत्रातही भाजपला मागे टाकत गण्यारपवारांचा उमेदवार दुसऱ्या स्थानी आहे. इतर दोन ठिकाणी तिसऱ्या स्थानावर गण्यारपवार समर्थकांना समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने गण्यारपवारांना बाहेर लोटल्याने राकाँची वाताहात झाली आहे. आता तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मचिंतन करून यावर विचार करण्याची गरज आहे. काँग्रेसने प्रचंड संघर्षानंतर दोन जागा जिंकल्या असल्या तरी काँग्र्रेसने चामोर्शी तालुक्यात जि.प.ची निवडणूक मनावर घेतली नाही. आमदार विजय वडेट्टीवार वगळता, कोणताही मोठा नेता पक्षाच्या प्रचारासाठी आला नाही. पक्षाच्या उमेदवाराकडे रसदही पोहोचली नाही. काँग्रेसच्या दोन जागांवरचा विजय हा उमेदवारांनी स्वबळावर मिळविलेला विजय आहे. कुनघाडा रै.-तळोधी, हळदवाही-रेगडी हे दोन मतदार संघ वगळता काँग्रेस कुठेही दिसली नाही. या दोन्ही क्षेत्रात काँग्रेसचा झालेला पराभव हा पक्षासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. नेतृत्वाचा अभाव, विखुरलेले संघटन व वरिष्ठ नेत्यांचे कायम राहिलेले दुर्लक्ष यामुळे काँग्रेसला दोनपेक्षा पुढे पाऊल टाकता आले नाही. नोटबंदीनंतर ग्रामीण जनतेला शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला. मात्र सरकारवरचा हा राग काँग्रेसला निवडणुकीतून मांडता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला मोठा जनाधार याच तालुक्यातून मिळाला.