गोदाम बांधकामाचे देयक रखडले
By Admin | Updated: April 1, 2016 01:56 IST2016-04-01T01:56:24+5:302016-04-01T01:56:24+5:30
शासकीय अन्नधान्य वितरण प्रणालीद्वारे पुरवठा होणाऱ्या धान्याच्या साठवणुकीसाठी बांधण्यात आलेल्या गोदाम बांधकामाचे देयक रखडल्याने ...

गोदाम बांधकामाचे देयक रखडले
सिरोंचा : शासकीय अन्नधान्य वितरण प्रणालीद्वारे पुरवठा होणाऱ्या धान्याच्या साठवणुकीसाठी बांधण्यात आलेल्या गोदाम बांधकामाचे देयक रखडल्याने संबंधित कंत्राटदार अडचणीत आला आहे. ३१ मार्च अखेर संपणारे वित्तीय वर्ष पूर्ण व्हायला एक दिवस उरला असतानाही संबंधित विभागाकडून यासंदर्भात हालचाल दिसून येत नाही. दरम्यान काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने कर्जाऊ घेतलेल्या घेणेकऱ्यांचे तगादे वाढल्याने कंत्राटदार कचाट्यात सापडला आहे.
सिरोंचा येथील तहसील कार्यालयासमोर व उपकोषागार कार्यालयाच्या बाजूला या गोदामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन्ही इमारती स्वतंत्रपणे वेगवेगळ्या आहेत. पूर्वी प्रस्तावित आराखड्यानुसार एकच इमारत निर्माणाधीन होती. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम २ कोटी ४१ लक्ष रूपये आहे. मात्र त्यासाठी भूखंड अपुरा पडल्याने दोन इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इमारतीच्या सभोवताल अंतर्गत रस्त्यात अधिकची भर पडल्याने अंदाजपत्रकीय रकमेत वाढ होऊन ती २ कोटी ८० लक्ष रूपये झाली. डिसेंबर २०१३ मध्ये सुरू झालेले बांधकाम निर्धारित मुदतीत पूर्ण झाले.
एक वर्षापूर्वीच संबंधित विभागाला सदर इमारती हस्तांतरित करण्यात आल्या. अन्न महामंडळाकडून आवक होणाऱ्या धान्याची साठवणुकही या गोदामात सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष कागदोपत्री हस्तांतरण प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी पार पडली, अशी चर्चा आहे. अंदाजपत्रकीय रकमेत वाढ झालेल्या अतिरिक्त खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी कंत्राटदाराने सावकारांकडून कर्ज घेतले. सदर कर्ज निर्धारित मुदतीत अदा न झाल्याने घेणेकऱ्यांनी कंत्राटदाराच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे गावात येणेही बंद झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)