शेडला लोहपत्र्यांची प्रतीक्षा
By Admin | Updated: March 11, 2015 00:06 IST2015-03-11T00:06:00+5:302015-03-11T00:06:00+5:30
स्थानिक रेल्वे स्थानकावर शेडचे बांधकाम होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेडला लोहपत्रे लावण्यात आले नाही.

शेडला लोहपत्र्यांची प्रतीक्षा
लोकमत विशेष
महेंद्र चचाणे देसाईगंज
स्थानिक रेल्वे स्थानकावर शेडचे बांधकाम होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेडला लोहपत्रे लावण्यात आले नाही. त्यामुळे उभारलेले लोखंडी खांब केवळ देखावा ठरले असून रेल्वे प्रवाशांना उन्हातच रेल्वेची वाट पाहत बसावे लागत आहे.
देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे नागरिक प्रथम देसाईगंज येथूनच पुढचा प्रवास करतात. परिणामी या रेल्वे स्थानकावर नेहमीच गर्दी राहते. देसाईगंज येथे ६०० मीटर लांबीचा फलाट तयार करण्यात आला आहे. यापूर्वी या ठिकाणी टिनाचे केवळ दोनच शेड होते. परिणामी प्रवाशांची फार मोठी अडचण होत होती. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन याठिकाणी आणखी दोन शेडचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली होती.
या मागणीची रेल्वे विभागाने दखल घेऊन दोन नवीन शेड बांधकामाला सहा महिन्यांपूर्वी सुरुवात केली. यातील एका शेडचे बांधकाम पूर्णपणे झाले आहे. मात्र दुसरे शेडचे बांधकाम अपूर्ण राहिले आहे. या शेडचे लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत. मात्र टिनाचे पत्रे लावण्यात आले नाही. त्यामुळे या शेडचा प्रवाशांना कोणताही फायदा नसून उन्हातच राहावे लागत आहे. पुढील महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यावेळी प्रवाशांना सावली शोधण्यासाठी इतर शेडचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अपूर्ण शेडवर टिनाचे पत्रे टाकावे, अशी मागणी आहे.