दामरंचाला रस्त्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 9, 2015 01:48 IST2015-05-09T01:48:14+5:302015-05-09T01:48:14+5:30
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा येथील अनेक समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही.

दामरंचाला रस्त्याची प्रतीक्षा
कमलापूर : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा येथील अनेक समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. परिसरातील पूल, रस्ते व अन्य सोयी- सुविधांचा अभाव आहे. येथील लोकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र गावापर्यंत रस्ता निर्मिती करण्याकडे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
कमलापूर- दामरंचा मार्गाचे अंतर २२ किमी असून सदर मार्गाची डागडूजी करण्यात आली आहे. या मार्गावर पाच ते सहा नाले येतात. मात्र या नाल्यांवर पुलांचे बांधकाम अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरातील भंगारामपेठा, रूपतकसा, चिटवेली, चिंतारेव, मांडरा, आसा, नैनगुडम यासह अनेक गावातील लोकांना पावसाळ्यात कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या क्षेत्रात हजारो लोकवस्ती आहे. मात्र ये- जा करण्याकरिता पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. परिणामी दळणवळणाची साधने उपलब्ध होत नाही. एसटी महामंडळाची बसही येथे पोहोचत नाही.
बाजारपेठ उपलब्ध नसल्याने लोकांना बाहेरगावी सायकल अथवा चालत जाऊन साहित्य खरेदी करावे लागते. रस्ता निर्माण करण्याकडे दुर्लक्ष असल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. (वार्ताहर)