नव्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 6, 2016 01:15 IST2016-05-06T01:15:00+5:302016-05-06T01:15:00+5:30
गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची बदली करण्यात आली आहे.

नव्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतीक्षा
सीईओ झाले रूजू : रणजीतकुमार गेले सोलापूरला
गडचिरोली : गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार येथून सोलापूर येथे बदलीवर गेले. मात्र बांगर गडचिरोलीत रूजू झाले नाहीत. ते कधी रूजू होतील, याची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसोबतच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही बदली झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी संपदा मेहता या गडचिरोलीवरून अहमदनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून गेल्यात. त्यांच्या जागेवर जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून शंतनू गोयल हे राजुरा येथून उपविभागीय अधिकारी पदावरून पदोन्नतीवर रूजू झालेत. परंतु जिल्हाधिकारी बांगर रूजू न झाल्याने अनेक उलटसुलट चर्चा नागरिक व प्रशासकीय वर्तुळात सुरू आहेत. अत्यंत तरूण जिल्हाधिकारी असलेले अभिजीत बांगर यापूर्वी सातारा येथेही जिल्हाधिकारी होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना सातारा येथे जिल्हाधिकारी पदावर खास रूजू करून घेऊन या भागातील विकास कामांना गती दिली होती. त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचीही जबाबदारी त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली. अत्यंत सामान्य कुटुंबातून मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातून पुढे आलेले बांगर हे विवाहीत असून त्यांच्या पत्नी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण ठाणे, मुंबई येथे घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकारने एक तरूण जिल्हाधिकारी या जिल्ह्याला दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात असली तरी बांगर येथे रूजू होतात काय, याविषयी सर्वसामान्यांमध्ये मात्र चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)