४५ हजार ३५० हेक्टरला सिंचनाची प्रतीक्षा

By Admin | Updated: July 29, 2015 01:50 IST2015-07-29T01:50:47+5:302015-07-29T01:50:47+5:30

गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन ३३ वर्षे झाली. परंतु या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात राज्य सरकारला कमालीचे अपयश आले आहे.

Waiting for irrigation 45 thousand 350 hectare | ४५ हजार ३५० हेक्टरला सिंचनाची प्रतीक्षा

४५ हजार ३५० हेक्टरला सिंचनाची प्रतीक्षा

अहेरी : गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन ३३ वर्षे झाली. परंतु या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात राज्य सरकारला कमालीचे अपयश आले आहे. अहेरी उपविभागात ५० हजार १०० हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैकी ४५ हजार ३५० हेक्टर जमीन अजूनही सिंचनाखाली आणण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत आहे.
अहेरी उपविभागात भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा हे पाच तालुके येतात. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ५० हजार १०० हेक्टर जमीन पिकाखाली आहे. त्यापैकी ४ हजार ५५० हेक्टर जमीन ओलिताची आहे. तर ४५ हजार ५५० हेक्टर आर जमीन कोरडवाहू आहे. पावसाच्या भरवशावर या भागातील शेतकरी शेती करीत आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, आदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बोडी, शेततळे, बंधारे, मजग्या आदीचे कामे करण्यात आली.
प्रत्यक्षात सर्व कामे कागदोपत्रीच झाल्याने अहेरी उपविभागात केवळ १० टक्क्यापेक्षा कमी सिंचन व्यवस्था निर्माण होऊ शकली. अहेरी तालुक्यात १५ हजार हेक्टर आर क्षेत्र पिकाखाली आहे. यातील १ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताचे तर १ हजार ४०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे.
एटापल्ली तालुक्यात १३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून ५५० हेक्टर क्षेत्र ओलिताचे तर १३ हजार १५० कोरडवाहू क्षेत्र आहे. भामरागड तालुक्यात ७ हजार ९०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. पैकी ५०० हेक्टर क्षेत्रावर ओलिताची सोय आहे. ७ हजार २०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. सिरोंचा तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. पैकी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलीताचे तर ११ हजार हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढविण्यासाठी आजवर आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सिंचन विभाग, कृषी विभाग यांच्याकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु याचा कोणताही फायदा अजूनपर्यंत दिसलेला नाही.
२६ जुलै रोजी चेन्ना प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळाने वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपुरात भेट घेतली. त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिली, अशी माहिती आहे. चेन्ना प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी व नागरिक सध्या आक्रमक झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
चेन्ना प्रकल्प रखडला
मुलचेरा तालुक्यातीत चेन्ना प्रकल्पाचे काम रखडले असून त्यावेळी धारणाच्या २१़७० मीटर उंचीची भिंत व १० मीटर काम झाल्यानंतर प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले़ १४ किमीचा कालवा बांधण्यात आला़ या प्रकल्पामुळे २२३० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते़ प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर चेन्ना प्रकल्प पूर्ण करण्याचा आश्वासन दिले जाते. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी सुंदरनगर येथे प्रचारसभेत चेन्ना प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दिले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठी आशा आहे.
दोन उपसा सिंचन योजनांना नव्याने मान्यता घ्यावी लागणार
अहेरी तालुक्यातील देवलमारी व महागाव गर्रा या दोन उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र वनकायदा आड आल्याने तसेच भूसंपादनाची प्रक्रिया न झाल्याने या दोन्ही सिंचन योजनेचे काम सुरू होऊ शकले नाही. या दोन्ही उपसा सिंचन योजनेची मान्यता व्यपगत झाली आहे. मंजुरीची मुदत संपल्यामुळे पाटबंधारे विभागाला नव्याने प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडून या दोन्ही सिंचन योजनेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. नवीन दराने सदर प्रकल्प सुरू करावा लागणार असून याची किंमतही वाढणार आहे.
अहेरी उपविभागातील बांधकामाधिन प्रकल्पाची सद्य:स्थिती
सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन योजनेला १६ सप्टेंबर २००८ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी या प्रकल्पाची किमत ३५ कोटी होती. मार्च २०१४ पर्यंत ०.११ लाख रूपयांचा खर्च या योजनेवर झाला. १ एप्रिल २०१४ ला उर्वरित किमत ३४.८९ कोटी आहे. या प्रकल्पामुळे २०५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. २०१४-१५ करिता ०.५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाने दिली आहे.
एटापल्ली तालुक्यातील डुम्मी नाला, मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या दोन प्रकल्पांना वनबाधिक प्रकल्पाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. चेन्नासाठी ११८.२३ हेक्टर तर डुम्मी नालासाठी ३७५.४५ हेक्टर वनजमीन लागणार आहे. मार्च २०१४ अखेर डुम्मी नालावर ०.७७ लाख रूपयाचा खर्च करण्यात आला आहे. तर चेन्नाला १.४३ लाख रूपयांचा खर्च झाला आहे.
सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका, टेकडा, अहेरी तालुक्यातील महागाव, देवलमरी, मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम हे प्रकल्प अन्वेषणाखालील प्रकल्प आहे. पेंटीपाका प्रकल्पाची अद्ययावत किमत ४३.०४ कोटी असून २२१८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. १०.७० हेक्टर वनजमीन लागणार आहे. शांतिग्राम प्रकल्पाची अद्ययावत किमत ५३.७४ कोटी असून २१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ९.३० हेक्टर वनजमीन लागणार आहे. महागाव गर्रा या प्रकल्पाची अद्ययावत किमत ३९.७७ कोटी तर देवलमरी प्रकल्पाची किमत ४५.०५ कोटी आहे. महागाव गेर्रामुळे ३४५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. देवलमरीमुळे ३३.५५ हेक्टर वनजमीन सिंचनाखाली येईल. या प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Web Title: Waiting for irrigation 45 thousand 350 hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.