शेतकरी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: June 29, 2014 23:54 IST2014-06-29T23:54:26+5:302014-06-29T23:54:26+5:30

जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची

Waiting for farmers' guidance | शेतकरी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

शेतकरी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

गडचिरोली : जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी नेमक्या याचवेळी गावाकडे पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यात जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रीय होत असल्याने पेरणीच्या कामांना वेग येत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजूनपर्यंत जिल्ह्यातील एकाही तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. १७ जूननंतर पावसाने कायमची दडी मारली आहे. जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावा नसल्याने शेतकरी बियाण्यांची पेरणी करण्यास घाबरत आहे. हजारो रूपये किंमतीचे बियाणे पेरल्यानंतर सदर बियाणे पावसाअभावी न उगविल्यास दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अजुनपर्यंत बियाण्यांची पेरणी केलेली नाही. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात कमालीची घट होत असल्याने काही शेतकऱ्यांनी मात्र बियाण्यांची पेरणी केली आहे. आता मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकंदरीतच ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे , असे शेतकरी व ज्यांनी पेरणी केली नाही अशाही शेतकऱ्यांवर चिंतेचे मभळ निर्माण झाले आहे. नेमके काय करावे हे सूचत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग कायमचा गोंधळला आहे.
पावसाला उशीर झाल्यास कोणत्या बियाण्यांची लागवड करावी, पेरलेले बियाणे वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. कृषी सहाय्यकांचे मात्र गावाकडे फिरणे बंद झाले आहे. घरबसल्या शासनाकडे अहवाल पाठवित आहेत. कृषी सहाय्यकाकडे १० ते १२ गावांचे काम सोपविण्यात आले आहे. एका गावातील शेतकऱ्याने फोन लावल्यानंतर दुसऱ्या गावात असल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याचवेळा तर मिटींगचे कारण देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न कृषी सहाय्यक व कृषी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. आजपर्यंत आधुनिक शेतीची संकल्पना मांडणारे कृषी सहाय्यक ऐन अडचणीच्यावेळी गावाकडे फिरकत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जवळपास ५० धान रोवणी यंत्र खरेदी करून देण्यात आले आहे. त्याचे प्रशिक्षण, मोठ-मोठे कार्यक्रम घेऊन उन्हाळ्यातच देण्यात आले. त्यामुळे धान लागवडीला उन्हाळ्यातच सुरूवात झाली असावी असे वातावरण निर्माण झाले होते. आता मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Waiting for farmers' guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.