वीज खांबांना अपघाताची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 27, 2016 01:46 IST2016-07-27T01:46:35+5:302016-07-27T01:46:35+5:30
आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत.

वीज खांबांना अपघाताची प्रतीक्षा
वीज विभागाचे होत आहे दुर्लक्ष : आरमोरीत अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीच्या खोळंब्याने नागरिक त्रस्त
विलास चिलबुले आरमोरी
आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत. सद्य:स्थितीत आता चार खांब रस्त्यावर आहेत. मात्र सदर खांब अजूनपर्यंत बाजुला करण्यात आले नाही. त्यामुळे एमएसईबी सदर खांब हटविण्यासाठी एखाद्या मोठ्या अपघाताचीच प्रतीक्षा करीत असावी, असा उपरोधिक सवाल आरमोरी शहरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीसुद्धा होत आहे. आरमोरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या शहरातून नागपूर, गडचिरोली, देसाईगंज व ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्या तसेच जड वाहने ये-जा करतात. त्यामुळे येथील मुख्य मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. शहराच्या विस्तारानंतर अतिक्रमण हटवून मुख्य मार्गाचाही विस्तार करण्यात आला. मात्र मार्गावर असलेले वीज विभागाचे खांब हटविण्यात आले नाही.
काही वर्षांपूर्वीपर्यंत या मार्गावर १० खांब होते. त्यापैकी चार खांब रस्त्याच्या बाजुला होते. उर्वरित सहा खांब रस्त्यावर आले होते. यापैकी दोन खांबांना ट्रकने धडक दिली. या धडकेत सदर खांब पूर्णपणे वाकून निकामी झाले. त्यानंतर सदर खांब वीज विभागाने नव्याने लावून ते रस्त्याच्या बाजुला गाडले. त्याचवेळी उर्वरित चार खांब रस्त्याच्या बाजुला केले असते तर ही समस्या तेव्हाच मिटली असती. मात्र एमएसईबीने तुटलेले दोन खांबच बाजुला गाडले. उर्वरित बँक आॅफ इंडिया, भगतसिंग चौकातील सोमनकर यांच्या घरासमोरील, पंचायत समिती समोरील व बर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील चार खांब अजूनही रस्त्यावरच आहेत. सदर खांब वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. या खांबामुळे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. त्यामुळे सदर खांब हटविणे अत्यंत आवश्यक असले तरी एमएसईबीने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. सदर खांब तत्काळ हटवावे, अशी मागणी आहे.
खांबांच्या आड अवैध पार्र्किं ग व अतिक्रमण वाढले
रस्त्यावर असलेल्या वीज खांबांमुळे ये-जा करणारी वाहने रस्त्याच्या बाजूने जाऊ शकत नाही. त्यामुळे वीज खांबाच्या बाजूची जागा सुरक्षित मानली जाते. या जागेपर्यंत काही दुकानदारांनी दुकानांचा विस्तार केला आहे व त्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर या वीज खांबांच्या आड खासगी प्रवासी वाहने उभी केली जातात. याच ठिकाणावरून प्रवाशांचीही वाहतूक करतात. या चार खांबांनी आरमोरीच्या वाहतूक व्यवस्थेची पार वाट लावली आहे. त्यामुळे सदर खांब हटविणे आवश्यक झाले आहे.