१२८७ गावांना ९०.१७ लाखांची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 7, 2015 22:52 IST2015-01-07T22:52:29+5:302015-01-07T22:52:29+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यातील एकूण १ हजार २८७ गावांकरिता शासनाने ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

१२८७ गावांना ९०.१७ लाखांची प्रतीक्षा
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यातील एकूण १ हजार २८७ गावांकरिता शासनाने ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र वर्ष संपायला केवळ दोन महिने शिल्लक असले तरी हा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने संबंधीत लाभार्थ्यांना फटका बसत आहे.
जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती असून १ हजार ६६० गावे आहेत. एनआरएचएम अंतर्गत १ हजार २८७ गावांसाठी ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर निधी खर्च करण्यासाठी एक समिती गठित करण्यात येते. या समितीच्या अध्यक्षपदी गावचे सरपंच तर सदस्यपदी गावातील अंगणवाडी सेविका राहते. दोघांच्या नावे बँकेत खाते उघडले जाते. नंतर सदर नियोजित निधी त्या खात्यामध्ये जमा केल्या जाते. यानंतर समिती प्रस्ताव आमंत्रित करून निधी खर्च करते. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याशी संबंधीत इतर कामे या निधीतून केली जातात. यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यशासनाकडे व त्यानंतर जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण संस्थेकडे सदर निधी दिला जातो. या निधीतून ग्राम आरोग्य योजना, न्युट्रिशन डे, आरोग्यविषयक ग्रामसभा, ग्राम आरोग्यासाठी खरेदी, कुपोषित बालकांसाठी पोषक तत्त्व योजना, गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी प्रवासाची सोय, कुत्रा किंवा सर्पदंश झाल्यास रुग्णालयापर्यंतचा मोफत प्रवास व औषधोपचार तसेच गावागावात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. याशिवाय गावात होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे शुद्धिकरण, शासकीय नळ तुटल्यास त्याची सुधारणा, अंगणवाडीची रंगरंगोटी, दुरूस्ती, फर्निचर तसेच अंगणवाडीतील बालकांसाठी खेळणी खरेदी करण्यावरही सदर निधी खर्च केला जातो.
या योजनेतून ० ते ५०० लोकसंख्या असलेल्या गावास ५ हजार रूपये, ५०१ ते १ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या गावास ८ हजार रूपये, १ हजार ५०१ ते ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावास १५ हजार रूपये, १० हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावास २४ हजार रूपये व १० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावास ३० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. मात्र निधीच उपलब्ध झाला नसल्याने ही सर्व कामे ठप्प पडली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी या निधीची अत्यंत आवश्यकता होती. मात्र निधीच प्राप्त झाले नसल्याने समितीसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी लाभार्थ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)