अंगणवाडी महिलांचे वेतन थकले

By Admin | Updated: December 30, 2014 23:35 IST2014-12-30T23:35:47+5:302014-12-30T23:35:47+5:30

अंगणवाडी महिलांना राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे मानधन मागील चार महिन्यांपासून मिळाले नसून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

The wages of the anganwadi women are tired | अंगणवाडी महिलांचे वेतन थकले

अंगणवाडी महिलांचे वेतन थकले

गडचिरोली : अंगणवाडी महिलांना राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे मानधन मागील चार महिन्यांपासून मिळाले नसून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मानधनाची रक्कम तत्काळ न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी महिलांनी पेरमिली येथील मेळाव्यादरम्यान दिला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य व केंद्रशासन मिळून मानधन देतात. राज्यशासनाच्यावतीने २ हजार रूपये तर केंद्रशासनाच्यावतीने २ हजार रूपये असे एकूण ४ हजार रूपये मानधन दिल्या जाते. केंद्राचे मानधन प्राप्त झाले आहे. मात्र राज्याकडून मिळणारे मानधन चार महिन्यांचा कालावधी लोटूनही देण्यात आले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन दिले जाते. तेही मानधन वेळेवर मिळत नाही. राज्यशासनाकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठी शासनाकडे पैसे उपलब्ध नाहीत काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
पेरमिली येथे रेखा येनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे, अंगणवाडी महिला कर्मचारी लतिका दहागावकर, सत्तुबाई येनपरेड्डीवार, ललिता देवतळे, संध्या दहागावकर, काटेश्वरी मुळावार, गिरीजा दुर्गे, बेबी गावळे, शांता कोंडागुर्ले, शांता चांदेकर, जाई गावळे आदी उपस्थित होत्या. राज्यशासनाने थकलेले मानधन तत्काळ उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी दिला आहे. पेरमिली येथे आयोजित मेळाव्याला परिसरातील अनेक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दहिवडे यांनी शासनकर्ते बदलले की, सर्व काही बदलते, हा सर्वसामान्य जनतेचा गैरसमज आहे. नेता नाही तर नीती बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The wages of the anganwadi women are tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.