मतदारांनी नक्षलवाद्यांना जुमानले नाही
By Admin | Updated: October 18, 2014 01:29 IST2014-10-18T01:29:06+5:302014-10-18T01:29:06+5:30
तालुक्यातील ६० मतदान केंद्रावर १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

मतदारांनी नक्षलवाद्यांना जुमानले नाही
एटापल्ली : तालुक्यातील ६० मतदान केंद्रावर १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. एटापल्ली तालुक्यात पुरूष २३ हजार १३६ व महिला २१ हजार ६९५ असे एकूण ४४ हजार ८३१ मतदारांची संख्या आहे. यापैकी १४ हजार ५९४ पुरूष व ११ हजार १२८ महिला असे एकूण २५ हजार ७२२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविला. एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या आवाहनाला न जुमानता उत्स्फूर्त मतदान केल्याने या तालुक्यात ५७.०४ टक्के मतदान झाले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सुरूवातीपासूनच नक्षलवाद्यांनी तालुक्यातील दुर्गम भागातील गावात बॅनर बांधून तसेच पत्रक टाकून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. याशिवाय नक्षल्यांनी निवडणुकीच्या काळात हिंसक कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. नक्षलवाद्यांच्या विरोधाला तसेच भीतीला न जुमानता एटापल्ली तालुक्यातीन नागरिकांनी या विधानसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदान केले. एप्रिल महिन्यात झालेले लोकसभा निवडणुकीत एटापल्ली तालुक्यातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले होते. त्यामुळे या तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६२ होती. पावसामुळे बांडीया नदीला भरपूर पाणी असल्यामुळे नदीपलिकडे असलेले दोलंदा, भापळा, सोहगाव आदी गावातील तीन केंद्र जारावंडी येथे हलविण्यात आले होते. तसेच बांडीया नदीपलीकडील कचरेल, बुर्गी, कुदरी या गावातील तीन मतदान केंद्र हालेवारा येथे हलविण्यात आले होते. या तीनही गावातील नागरिकांनी नदी पार करून जारावंडी येथील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. दोलंदा मतदान केंद्रावर ३८.६३ टक्के, भापडा ५३.२४ टक्के व सोहगाव येथे ३९.१८ टक्के मतदान झाले आहे. पोलीस विभागाच्यावतीने मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)