ईव्हीएम मॉक पोलिंगद्वारे मतदार जागृती
By Admin | Updated: September 25, 2014 23:24 IST2014-09-25T23:24:26+5:302014-09-25T23:24:26+5:30
मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणाहून मतदार मदत केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून मतदार जनजागृतीबाबत

ईव्हीएम मॉक पोलिंगद्वारे मतदार जागृती
गडचिरोली : मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणाहून मतदार मदत केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून मतदार जनजागृतीबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात उपक्रम राबविले जात आहेत. याचा जिल्ह्यातील मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
मतदार जनजागृतीबाबत प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची निवडणूक निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी पाहणी केली. त्याबरोबरच अनेक महत्वपूर्ण सूचनाही केल्या. गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौक, जिल्हा परिषद शाळा तसेच अन्य केंद्रावरून मतदार जागृती केली जात आहे. याची पाहणीही निवडणूक निरीक्षक कृपाशंकर यादव यांच्यासह जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केली. जिल्ह्यात मतदार जागृतीबाबत प्रशासनातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम समाधानकारक असल्याचे मत कृपाशंकर यादव यांनी व्यक्त केले.
गडचिरोली, अहेरी व आरमोरी विधानसभा क्षेत्रात विविध शाळा, सार्वजनिक ठिकाणाहून मतदार, भावी मतदारांना बॅलट, कंट्रोल युनिट यांच्या सहाय्याने मतदान करण्याबाबतची माहिती ईव्हीएम मॉक पोलिंग प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येत आहे. त्याबरोबरच मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले जात आहे व मतदारांमधील उत्साह वाढावा या दृष्टीने प्रात्यक्षिकांवर भर दिले जात आहे. मतदारांमध्ये असलेल्या अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यावर निवडणूक विभाग भर देत आहे. युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत मतदार मदत केंद्रांना नागरिक भेट देत असून ईव्हीएम मॉक पोलिंगचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले आहे.