व्हॉलिबॉल स्पर्धेच्या महासंग्रामाला सुरुवात
By Admin | Updated: November 2, 2015 01:07 IST2015-11-02T01:07:52+5:302015-11-02T01:07:52+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली ..

व्हॉलिबॉल स्पर्धेच्या महासंग्रामाला सुरुवात
थाटात उद्घाटन : क्रीडा विभागाच्या उपसंचालकांनी सोयी-सुविधांची केली प्रशंसा
गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली व गोंडवाना सैनिकी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते रविवारी पार पडले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रणजीतकुमार, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे विभागीय उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे सतीश पवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैंठणकर, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवून व क्रीडाध्वज फडकावून करण्यात आले. राष्ट्रीयस्तरावरील खो-खोचा खेळाडू तथा गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा खेळाडू वैभव दळांजे याने उपस्थित संपूर्ण खेळाडूंना शपथ दिली.
या स्पर्धेत राज्यभरातील १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील प्रत्येक गटनिहाय ८ संघ असे एकूण २४ संघ व २८८ खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रत्येक विभागातून प्रत्येक वयोगटाकरिता १ या प्रमाणे २४ व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे १५ तांत्रिक अधिकारी तसेच प्रत्येक वयोगटासाठी १ याप्रमाणे एकूण ३ गटांसाठी ९ राज्य शासनाचे निवड समिती सदस्य सुद्धा सहभागी झाले आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते यांनी विद्यार्थी व युवकांसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळामुळे शारीरिक कसरत होण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, चिकाटी आदी गुण विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन अभ्यासाबरोबरच विद्यार्थी व शिक्षकांनी खेळाकडेही विशेष लक्ष पुरविले पाहिजे, असे आवाहन केले. केंद्र शासन खेळासाठी विशेष धोरण आखत असल्याची माहिती दिली.
क्रीडा व युवक सेवा विभाग नागपूरचे विभागीय उपसंचालकांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. २५ वर्षांच्या कालखंडात आजपर्यंत अशी सुंदर व्यवस्था राज्यस्तरावर आपण बघितली नाही, असे मनोगत व्यक्त केले. संचालन ओमप्रकाश संग्रामे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)