कुलगुरूंचा दुर्गम भागात दौरा
By Admin | Updated: November 29, 2014 23:20 IST2014-11-29T23:20:55+5:302014-11-29T23:20:55+5:30
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी आज शनिवारला अहेरी तालुक्यात दौरा करून तेथील महाविद्यालय व शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या.

कुलगुरूंचा दुर्गम भागात दौरा
अहेरी : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी आज शनिवारला अहेरी तालुक्यात दौरा करून तेथील महाविद्यालय व शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी अहेरी शहरातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संवाद साधला.
अहेरी येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयात आयोजित चर्चासत्राच्या कार्यक्रमात अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी त्यांनी उच्च शिक्षणाच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. दीक्षित म्हणाले. सत्र परीक्षेचे नियोजन करण्यात न आल्याने सध्या सुरू असलेल्या सत्र परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. पुढील वर्षांपासून विद्यापीठाच्यावतीने योग्य नियोजन करून १५ नोव्हेंबरपासून पहिले सेमिस्टर व एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपासून दुसरे सेमिस्टर परीक्षा घेण्याचा मनोदय डॉ. दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केला. दुर्गम भागात इंटरनेट सेवेचा अभाव असल्यामुळे पुढील वर्षांपासून नियोजित ठिकाणी आवेदनपत्र विद्यापीठस्तरावरून संकलीत केले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्राचार्य मनोरंजन मंडल, प्राचार्य अरूण लोखंडे, मुलचेराचे प्राचार्य रणजित मंडल, प्राचार्य घुटे, प्राचार्य डॉ. भोयर, प्राचार्य विष्णू सोनावणे, प्राचार्य डॉ. लाड, प्राचार्य फुलझेले आदी उपस्थित होते. सभेचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद काटकर यांनी मानले. यावेळी प्राचार्यांनी समस्या मांडल्या. (तालुका प्रतिनिधी)