आलदंडीत राष्ट्रध्वजाचा अवमान
By Admin | Updated: August 18, 2015 01:29 IST2015-08-18T01:29:27+5:302015-08-18T01:29:27+5:30
स्थानिक पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एटापल्ली तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावरील आलदंडी

आलदंडीत राष्ट्रध्वजाचा अवमान
एटापल्ली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एटापल्ली तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावरील आलदंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सूर्यास्तानंतर जवळपास ७ वाजताच्या सुमारास फडकलेला राष्ट्रध्वज उतरविण्यात आला. या शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
आलदंडी येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या दोन शिक्षकी शाळेत १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व सहायक शिक्षक स्वगावी निघून गेले. दरम्यान या शाळेतील फडकविलेला राष्ट्रध्वज सायंकाळी सूर्यास्तानंतरही ६.४५ वाजेपर्यंत फडकत असल्याची चर्चा गावात होती. त्यानंतर सदर प्रतिनिधीने शाळेत जाऊन पाहणी केली असता, शाळेतील राष्ट्रध्वज फडकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर गावातील नागरिक कन्ना गोटा हे शाळेच्या कुलूपबंद प्रवेशद्वारावर चढून फडकलेला राष्ट्रध्वज उतरवून आपल्या घरी नेताना दिसून आले. मुख्याध्यापिका एम. व्ही. कुमरे व सहायक शिक्षक एस. के. अलोणे यांच्या बेजबाबदारपणामुळे सदर प्रकार घडल्याचे दिसून येते. राष्ट्रध्वज उतरविलेले कन्ना गोटा हे शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. मुख्याध्यापकांनी गोटा यांच्यावर राष्ट्रध्वज उतरविण्याची जबाबदारी सोपविली होती. (तालुका प्रतिनिधी)
मार्र्कंडा शाळेतील राष्ट्रध्वज मुलाने उतरविला
४चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत मार्र्कंडा (कं) येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले. मात्र या शाळेतील फडकलेला राष्ट्रध्वज शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाने उतरविल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आपल्या कर्तव्याप्रती किती जागरूक आहेत, याची प्रचिती येते. मार्र्कंडा (कं.) शाळेचे मुख्याध्यापक व काही शिक्षक मुख्यालयी राहत नाही. ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक स्वगावी निघून गेले. शाळेतील फडकलेला ध्वज उतरविण्यासाठी कुणीही न आल्याचे पाहून गावातील एका मुलाला ध्वज उतरविण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान सोमवारी मार्र्कंडा ग्रा.पं.मध्ये बोलाविण्यात आलेल्या तंटामुक्त समितीच्या सभेत संबंधित मुख्याध्यापकाने माफीनामा लिहून दिल्याने सदर प्रकरण मिटविण्यात आले. शाळेत खिचडी शिजविणाऱ्या निर्मला लोणारे यांचा मुलगा विवेक लोणारे याने राष्ट्रध्वज उतरविला.
तिरंगा झेंडा उतरविण्याची नियमावली काय आहे, हे पाहावे लागेल. तालुक्यात अनेक शाळांमधील झेंडे गावातील नागरिकच उतरवितात. आलदंडी जि.प. शाळेत राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याबाबतची गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करू.
- एन. डी. माटुरकर, गट शिक्षणाधिकारी, एटापल्ली
आलदंडी जि.प. शाळेत शालेय पोषण आहाराचे काम करणारे कन्ना गोटा हे नेहमीच फडकलेला तिरंगा ध्वज उतरवित असतात. यावेळी राष्ट्रध्वज उतरविताना त्यांनी वेळेची चूक केली असेल.
- एम. व्ही. कुमरे,
मुख्याध्यापिका, जि.प. शाळा आलदंडी