वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन
By Admin | Updated: February 8, 2017 02:36 IST2017-02-08T02:36:43+5:302017-02-08T02:36:43+5:30
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांकडून अपघात होत असल्याने

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन
सिरोंचातील प्रकार : बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वाढली
सिरोंचा : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांकडून अपघात होत असल्याने सिरोंचा तालुका मुख्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते अरूंद तसेच अतिक्रमण वाढल्यामुळे सिरोंचाच्या बसस्थानक परिसरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे.
गोदावरी नदीवर पूल झाल्याने आंतरराज्यीय वाहनांची वर्दळ सिरोंचा तालुका मुख्यालयात वाढली आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी वाहनांची प्रचंड गर्दी असते. येथील एसटी बसस्थानक परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा निरनिराळी वाहने मोठ्या संख्येने उभ्या केली जातात. ‘नो पार्र्किंग झोन’ असलेल्या या मध्यवर्ती चौकात तेलंगणा स्टेट ट्रॉन्सपोर्टच्या वाहनांचेही आवागमन प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत या चौकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. परिणामी नियम मोडणाऱ्यांपेक्षा नियम पाळणाऱ्यांनाच जखमी व्हावे लागत आहे. बरेचदा मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालक स्वत:ची चुक मान्य न करता सभ्य लोकांशी हुज्जत घालत असल्याचेही दिसून येते. अशावेळी बघ्यांची गर्दी वाढून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सिरोंचा शहरात अपघात वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुका मुख्यालयाचे मध्यवर्ती ठिकाण असूनही येथे वाहतूक पोलीस नसल्याने भर चौकात बाचाबाची होण्याचे प्रकारही वाढले आहेत. येथील चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)