लोहखनिज नेणारे तीन ट्रक ग्रामस्थांनी रोखले
By Admin | Updated: April 6, 2016 01:06 IST2016-04-06T01:06:47+5:302016-04-06T01:06:47+5:30
तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील लोहखनिजाची अवैधरित्या वाहतूक करणारे तीन ट्रक ग्रामस्थांनी मंगळवारी ...

लोहखनिज नेणारे तीन ट्रक ग्रामस्थांनी रोखले
महसूल विभागाची कारवाई : सूरजागड पहाडीतून सुरू होती लोहखनिजाची अवैध वाहतूक
एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील लोहखनिजाची अवैधरित्या वाहतूक करणारे तीन ट्रक ग्रामस्थांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता वन विभागाच्या नाक्याजवळ पकडले. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर येऊन ट्रक जप्तीची कारवाई केली.
मागील १५ दिवसांपासून लापडस मेटल या कंपनीने हेडरीपासून लोहखनिज पहाडीपर्यंत रस्ता बनविण्याच्या कामाला सुरुवात केली. रस्त्याचे काम जोरात सुरू असतानाच सोमवारी या कंपनीने कमालीची गोपनीयता बाळगून एमएच-३१-सीबी-७७७९, एमएच-३४-एबी-९८७, एमएच-३४-एबी-८९६५ या क्रमांकाच्या तीन ट्रकने पहाडीवरून लोहखनिज वाहतूक सुरू केली. याची माहिती मिळताच रवी रामगुंडेवार, जनहितवादी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी तत्काळ नाक्यावर जाऊन चौकशी केली. संबंधित ट्रक चालकाकडे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे खनिज वाहतूक परवाना आढळून आला. तसेच खनिज पट्टाधारक म्हणून मेटल अॅण्ड इंजिनिअर्स याचा उल्लेख होता. त्यांच्याकडील टीपीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाचा शिक्काही आढळून आला. त्यानंतर नाक्यावर जमलेल्या नागरिकांनी लोहखनिज दगडांनी भरलेले तिन्ही ट्रक सायंकाळी दोन तास रोखून धरले. कंपनीचे अधिकारी आले नाही. मात्र माहिती मिळताच एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंदोलनादरम्यान येथील लोहखनिज नेऊ देणार नाही, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले होते.
टिपीमध्ये सदर लोहखनिज कुठे नेण्यात येत आहे, याचा उल्लेख नसल्याने सदर ट्रकची चौकशी करण्यात येईल, असे तहसीलदार खलाटे यांनी सांगितले. तर शासनाने वाहतूक परवाना दिल्यामुळे सदर ट्रक थांबविण्याचे आम्हाला अधिकार नाही, असे एटापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी मडावी यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)