गावकऱ्यांनी केला दारूमुक्तीचा संकल्प
By Admin | Updated: June 29, 2015 01:55 IST2015-06-29T01:55:33+5:302015-06-29T01:55:33+5:30
गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असूनही अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

गावकऱ्यांनी केला दारूमुक्तीचा संकल्प
कोडसेलगुड्डम येथे बैठक : दारूबंदी समितीची स्थापना, दारू विक्रेत्यांवर होणार कारवाई
कमलापूर : गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असूनही अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. गाव व कुटुंबाच्या विकासासाठी दारूमुक्त समाजाची गरज ओळखून कोडसेलगुड्डमवासीयांनी दारूमुक्तीचा संकल्प केला आहे.
या संदर्भात रविवारी कमलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सांबय्या मोंडी करपेत यांच्या अध्यक्षतेखाली गावात मुख्य चौकात बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोडसेलगुड्डम गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने दारूमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. बाहेरगावावरून दारू आणून गावात विकणाऱ्यांवर १२ हजार रूपये, गावात मोहफुलाची दारू काढून विकणाऱ्यावर १० हजार रूपये व दारू प्राशन करून घरी व गावात भांडण करणाऱ्यांवर सहा हजार रूपये तसेच मद्यपींवर तीन हजार रूपये दंड आकारण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य संतोष सिडाम, मलय्या साकडी, राजम मडावी यांच्यासह बचत गटांच्या महिला व नागरिक उपस्थित होते. कमलापूर, ताटीगुड्डम, छल्लेवाडा या गावात दारूमुक्तीचा निर्णय घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)